सडामिर्या (रत्नागिरी) येथे वीर सावरकरांचा स्मृतीस्तंभ उभारण्याची मागणी
रत्नागिरी, ७ जून (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या तालुक्यातील सडामिर्या येथील ऐतिहासिक स्थळाचे संवर्धन करण्याविषयी रत्नागिरीवासियांच्या वतीने राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. दादर येथील वसंत स्मृती येथे झालेल्या कार्यक्रमात हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे क्रांतीकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना इंग्रजांनी रत्नागिरी येथे जवळजवळ १३ वर्षे स्थानबद्धतेत ठेवले होते. या १३ वर्षांच्या वास्तव्यादरम्यान समाजक्रांतीचे मोठे कार्य सावरकरांनी रत्नागिरीमध्ये केले. जातीभेद निर्मूलन व्हावे; म्हणून पतित पावन मंदिरामध्ये सहभोजनाचा कार्यक्रम केला. रत्नागिरीमध्ये वास्तव्यास असतांना सडामिर्या येथे स्वातंत्र्यवीर सावरकर ये-जा करत असत. त्याच ठिकाणी शासनाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘ने मजशी ने परत मातृभूमीला’ या काव्यपंक्ती स्तंभावर लिहिल्या होत्या; परंतु हा स्तंभ समुद्रकिनारी असल्यामुळे पडझड होऊन सद्य:स्थितीत तो या ठिकाणी दिसत नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याने पुनीत झालेल्या ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करून देशाच्या भावी पिढीमध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत जागृत आणि तेवत रहावी, यासाठी या ठिकाणी स्मारक व्हावे, अशी मागणी रत्नागिरीकर करत आहोत.
मंत्री मंगलप्रभात लोढा यांना विवेक व्यासपीठचे रत्नागिरी समन्वयक रवींद्र भोवड, श्री भागोजीशेठ कीर ट्रस्टचे विश्वस्त अधिवक्ता विनय आंबुलकर, व्यासपिठाच्या प्रतिनिधी तनया शिवलकर, मंगेश मोभारकर यांनी हे निवेदन मुंबईत नुकतेच दिले. या वेळी सौ. ऋतुजा भोवड, सौ. दीप्ती आगाशे, श्री. गौरांग आगाशे आदी उपस्थित होते.