१० जूनपासून कोकण रेल्वेचे वेळापत्रक पालटणार !
|
रत्नागिरी – कोकण रेल्वे प्रशासन पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले आहे. १० जूनपासून ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार गाड्या धावणार आहेत. अतीवृष्टीच्या वेळी रेल्वे ताशी ४० किलोमीटर वेगाने चालवण्याच्या सूचना रेल्वेच्या चालकांना (लोको पायलट्सना) देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात ६७३ रेल्वे कर्मचारी २४ घंटे गस्त घालतील, अशी माहिती एका परिपत्रकाद्वारे कोकण रेल्वे जनसंपर्क विभागाचे उपमहाप्रबंधक गिरीश करंदीकर यांनी दिली.
या पत्रकात म्हटले आहे की, कोकण रेल्वेने पावसाळा चालू होण्यापूर्वीची सिद्धता चालू केली आहे. रेल्वे मार्गाशेजारील पाणी वाहून जाणार्या गटारांची स्वच्छता, मार्गावरील तपासणी याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात भू-सुरक्षा उपाययोजना केल्यामुळे दगड पडणे, माती आणि दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली असून गेल्या १० वर्षांत रेल्वे सेवेत मोठा व्यत्यय आलेला नाही.
Konkan Railway In Monsoon : मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज, पावसातही वाहतूक सुरू ठेवण्यासाठी अशी आहे उपाययोजना#KonkanRailway #Monsoon2023 #Maharashtrahttps://t.co/6n5zZM2CQI
— ABP माझा (@abpmajhatv) June 7, 2023
बोगद्याच्या ठिकाणी चोवीस घंटे गस्त ठेवण्यात येणार आहे. येथे गाड्यांच्या वेगावरही निर्बंध ठेवण्यात येणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत गतीने हालचाल करण्यासाठी आवश्यक साहित्य सज्ज ठेवण्यात आहे. सुरक्षा कर्मचार्यांना आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी भ्रमणभाष संच, दोन्ही रेल्वे चालक आणि रेल्वे गार्ड्सना ‘वॉकी-टॉकी’ संच देण्यात आले आहेत. पावसातही ‘सिग्नल’ व्यवस्थित दिसावेत; म्हणून त्यातील दिवे ‘एलईडी’युक्त बसवण्यात आले आहेत.