‘डार्क वेब’ अमली पदार्थांचे जाळे गोव्यापर्यंत
(‘डार्क वेब’ म्हणजे विशेष संगणकीय प्रणालीद्वारे उघडता येणार्या छुप्या संकेतस्थळांचा समूह)
पणजी, ७ जून (वार्ता.) – ‘अमली पदार्थ नियंत्रण विभागा’ने (एन्.सी.बी.) ‘डार्क वेब’द्वारे देशभर अमली पदार्थांचा व्यवसाय चालवणार्या टोळीतील गोव्यातील तरुणासह देशभरातून ६ जणांना कह्यात घेतले आहे. संशयितांकडून सुमारे १५ सहस्र ‘एल्.एस्.डी. ब्लॉट्स’ हे अमली पदार्थ आणि अडीच किलो गांजा कह्यात घेण्यात आला आहे. कह्यात घेण्यात आलेल्यांमध्ये देहली येथील महिलेसह गोवा, केरळ, नोएडा, उत्तरप्रदेश या राज्यांतील संशयितांचा समावेश आहे. नोएडा येथे खासगी विद्यापिठात शिकणार्या गोव्यातील तरुणाला कह्यात घेण्यात आल्यानंतर या टोळीचा पर्दाफाश झाला. गोव्यापर्यंत ‘डार्क वेब’द्वारे पोचलेले अमली पदार्थांचे जाळे म्हणजे पोलिसांसमोर एक आव्हान आहे. ही टोळी अमली पदार्थांची तस्करी कुरियर आणि टपाल सेवेतून करत होती. सामाजिक माध्यमांचा वापर करून ‘डार्कवेब’द्वारे तस्करी करण्यात येत होती.
Drugs Case: ‘डार्कवेब’ ड्रग्स रॅकेट गोव्यापर्यंत; एनसीबीचे देशभर छापे#Goa #DrugsCase #Police #DainikGomantak https://t.co/nrOWwlpJEE
— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) June 7, 2023
‘डार्कवेब’ म्हणजे काय ?‘डार्कवेब’ हा एक अनधिकृत ‘वेब ब्राउझर’ आहे. त्यावर पुष्कळ संकेतस्थळे सांकेतिक स्वरूपामध्ये बनवलेल्या असतात. ‘गूगल’, ‘याहू’ यांसारख्या ‘सर्च इंजिन’वर शोधून सापडणार नाहीत, अशी संकेतस्थळे यावर उपलब्ध आहेत. अनधिकृत व्यवसायांसाठी ‘डार्कवेब’चा वापर केला जातो. याचे अन्वेषण करणे हे पोलिसांपुढील एक आव्हान आहे. |