विकासाच्या नावाखाली होणारा वेताळ टेकडीचा र्हास थांबवा ! – मनसे कार्यकर्त्यांची मागणी
पुणे – निसर्गाने समृद्ध असलेल्या वेताळ टेकडीचा विकासाच्या नावाखाली र्हास करून बालभारती ते पौड फाटा असा जो रस्ता होणार आहे त्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध असून असे प्रकल्प शासनाने राबवू नयेत, अशी विनंती मनसे कार्यकर्त्यांनी उपोषणाच्या वेळी केली. प्रशासनाने ऐकले नाही, तर पुढच्या काळात मनसे पद्धतीने आंदोलन करू, अशी चेतावणीही मनसेच्या पदाधिकार्यांनी महापालिका प्रशासनाला दिली. ‘जागतिक पर्यावरण दिना’ निमित्त पुणे शहर मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी वेताळ टेकडी वाचवा, पर्यावरण संरक्षण आणि जनजागृती यांसाठी सेनापती बापट रस्ता येथील बालभारती संस्थेच्या प्रवेशद्वारावर एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण केले.
विकासकामांना मनसेचा विरोध नाही; मात्र चुकीच्या पद्धतीने पर्यावरणाची हानी करून विकास होत असेल, तर त्याला विरोध आहे, असे मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजीत शिरोळे म्हणाले. या वेळी ‘वेताळ टेकडी बचाव कृती समिती’चे सदस्य, पर्यावरणप्रेमी, मनसेचे प्रवक्ते आदी उपस्थित होते.