विकलांग असूनही सेवेची तळमळ असणारे, अल्प कालावधीत आश्रमजीवनाशी समरस होणारे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. श्रीरंग कुलकर्णी (वय ४८ वर्षे) !
श्री. श्रीरंग कुलकर्णी हे सनातन संस्थेच्या साधिका आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांचे धाकटे बंधू असून ते जन्मतःच विकलांग आहेत. ते ऑगस्ट २०२१ पासून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून सेवा करत आहेत. ८.६.२०२३ (ज्येष्ठ कृष्ण पंचमी) या दिवशी त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
श्री. श्रीरंग कुलकर्णी यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा
१. अधिवक्त्या (सौ.) अदिती अमित हडकोणकर, पाळे-शिरदोन, गोवा
१ अ. नीटनेटकेपणा : ‘श्रीरंगदादांचे रहाणे साधे असले, तरी ते स्वच्छ आणि नीटनेटके आहेत.
१ आ. सेवाभाव : एकदा आश्रमातील यज्ञ झाल्यावर श्रीरंगदादा एका साधकाला लाकडी आसंद्या उचलून ठेवायला साहाय्य करत होते. तेव्हा श्रीरंगदादांची ती कृती अगदी सहज होती. ते पाहून ‘श्रीरंगदादा पुष्कळ आधीपासून सेवा करत असावेत’, असे मला वाटले.
१ इ. विकलांग असूनही इतरांचा विचार करणे : दादांसारखी प्रकृती असणार्या बाहेरील व्यक्ती चालतांना त्यांचा समोरील किंवा जवळपासच्या व्यक्तीला धक्का लागू शकतो. त्यामुळे इतरांना त्यांच्या बाजूने जातांना सावध राहून चालावे लागते; परंतु श्रीरंगदादा आश्रमात येता-जातांना ‘आपला कुणाला धक्का लागणार नाही’, असे सावध राहून चालतात. आश्रमात प्रसाद आणि महाप्रसाद यांच्या वेळेत भोजनकक्षात अनेक साधक येत-जात असतात. श्रीरंगदादांचे एवढ्या सर्व साधकांमध्ये स्वतःला सांभाळून काळजीपूर्वक चालणे वैशिष्ट्यपूर्ण वाटले.
१ ई. त्यांच्या तोंडवळ्यावर तेज जाणवते. त्यांच्याकडे पाहिल्यावर ‘त्यांची आंतरिक साधना चालू आहे’, असे जाणवते.
‘हे श्रीकृष्णा, तूच प्रत्येक साधकांमधील गुण कसे पहायचे ?, हे शिकवत आहेस’, यासाठी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
२. श्री. अरुण कुलकर्णी, बांदिवडे, फोंडा, गोवा.
२ अ. स्वावलंबी : ‘श्रीरंगदादा प्रसादाच्या वेळी स्वतःहून चहा घेतात आणि त्यांना शक्य होत नसेल, तर साधकांचे साहाय्य घेतात. हे पाहून ते पुष्कळ स्वावलंबी आहेत’, असे वाटते. त्यांच्यावर देवाची कृपा आहे.
२ आ. सेवाभाव आणि साधकत्व : एकदा आश्रमातील भोजनकक्षात स्वच्छतेच्या सेवांमध्ये श्रीरंगदादांचा सहभाग होता. तेव्हा मला त्यांच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळाली होती. ‘भोजनकक्ष स्वच्छता करतांना त्यांना सांगितलेली सेवा ते मन लावून करत होते. ते सेवेतील कृती विचारून करत होते आणि ती सेवा झाल्यावर ‘पुढील सेवा काय करायची ?’, हेही विचारत होते. या सर्व कृती पाहून त्यांच्यातील साधकत्व शिकायला मिळाले.’
३. श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
३ अ. आवड-नावड नसणे : ‘त्यांना आवड-नावड नाही. ते आश्रमात प्रसाद-महाप्रसाद यामध्ये जे पदार्थ असतील, ते ‘श्री गुरूंचा प्रसाद’ या भावाने ग्रहण करतात.
३ आ. परिस्थिती सहजतेने स्वीकारणे
१. श्री. श्रीरंग कुलकर्णी यांनी रामनाथी आश्रमात आल्यावर येथील परिस्थितीशी अल्प दिवसांत जुळवून घेतले.
२. श्री. श्रीरंग यांना रात्रीच्या वेळी झोपतांना पंखा हवा असतो; पण खोलीतील एका वयस्कर साधकांना पंखा नको असतो. श्रीरंग यांनी त्या परिस्थितीशी जुळवून घेतले आहे.
३. त्यांनी त्यांच्या प्रारब्धानुसार असलेले शारीरिक व्यंगत्व स्वीकारले आहे. त्याविषयी त्यांचे कोणतेही गार्हाणे नाही.
त्यांचे प्रारब्ध खडतर असले, तरी ‘ते लवकरच जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होतील, असे वाटते.’
४. श्री. देवदत्त कुलकर्णी (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ८० वर्षे)
४ अ. व्यवस्थितपणा
१. ‘श्री. श्रीरंग यांनी गादीवर चादर घातल्यानंतर त्या चादरीला एकही सुरकुती रहात नाही.
२. त्यांना लागणारे सर्व साहित्य एका पिशवीत व्यवस्थित ठेवलेले असते.
४ आ. ऐकण्याची वृत्ती असणे : श्री. श्रीरंग कुलकर्णी यांना रात्री अंथरुण घालण्यास पुष्कळ वेळ लागतो; म्हणून मी त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही, रात्री ९ वाजता अंथरुण घालत जा.’’ दुसर्या दिवशीपासून त्यांनी रात्री ९ वाजता अंथरुण घालण्यास प्रारंभ केला.
४ इ. इतरांचा विचार करणे : ‘माझी सेवा चौथ्या माळ्यावर असते आणि प्रतिदिन मी सकाळी ९ वाजता सेवेला जातो. तेथील स्वच्छता चालू असतांना मला माझ्या आसंदीवरून उठावे लागते. हे तेथील स्वच्छता करणार्या श्री. श्रीरंग कुलकर्णी यांच्या लक्षात आले आणि त्यांनी दुसर्या दिवशी सकाळी ९ वाजण्यापूर्वीच तेथील स्वच्छता पूर्ण केली.
४ ई. सतत सेवारत असणे : ते दिवसभर सतत शारीरिक कष्ट करतात. तरीही ते दुपारी विश्रांती घेत नाहीत.
४ उ. नामजपासहित सेवा करणे : सेवा करत असतांना त्यांचा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चालू असतो. पुष्कळ वेळा ते वहीतही नामजप लिहितात.’
५. योगिता घाटे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
५ अ. नम्रता आणि शांतपणा : ‘एकदा मी जिन्यावरून वर येत होते. तेव्हा ५ – ६ पायर्या चढल्यावर सहज मागे पाहिल्यावर श्री. श्रीरंग कुलकर्णी येत होते. मी त्यांना पहिल्यांदाच पाहिले; पण मला ‘त्यांच्याकडून नम्रता आणि शांती यांची स्पंदने येत आहेत’, असे मला जाणवले. शारीरिकदृष्ट्या त्रास असूनही ते आनंदी वाटत होते.’