सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी महर्षींच्या आज्ञेप्रमाणे बनवलेल्या दिव्य रथाच्या निर्मितीची प्रक्रिया आणि रथाची वैशिष्ट्ये !
सप्तर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव ११ मे या दिवशी साजरा करण्यात आला. या सोहळ्यात सप्तर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले काष्ठापासून बनवलेल्या सुवर्ण रंगाच्या दिव्य रथात विराजमान झाले होते. ‘या दिव्य रथाच्या निर्मितीची प्रक्रिया आणि त्याची वैशिष्ट्ये, तसेच साधकांना सेवा करतांना आलेल्या अडचणी, त्या अडचणींवर गुरुकृपेने केलेली मात अन् त्यांना आलेल्या बुद्धीअगम्य अनुभूती’ पुढे दिल्या आहेत. ७ जून या दिवशी आपण रथासाठीच्या लाकडाचा अभ्यास अन् लाकूड मिळण्याची प्रक्रिया पाहिली. आज त्यापुढील भाग पाहूया.
(भाग ३)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/689690.html
४. रथनिर्मितीच्या कार्याचा मुहूर्त
४ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि पू. काशीनाथ कवटेकरगुरुजी यांच्या शुभहस्ते पूजन करून रथनिर्मितीच्या कार्याचा मुहूर्त होणे : ‘२६.१२.२०२२ या दिवशी दुपारी ४.३० वाजेपर्यंत श्रवण नक्षत्र होते. श्रवण नक्षत्र हे तिरुपति बालाजीचे जन्मनक्षत्र आहे. सप्तर्षींनी याच नक्षत्रावर रथनिर्मितीचा मुहूर्त करण्यास सांगितले होते. योगायोगाने आम्हाला रथनिर्मितीच्या सेवेत मार्गदर्शन करणारे पंचशिल्पकार पू. काशिनाथ कवटेकरगुरुजी हेही याच कालावधीत आश्रमात आल्यामुळे त्यांच्या वंदनीय उपस्थितीत आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या शुभहस्ते हा मुहूर्त करण्यात आला.
मुहूर्ताच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनीही रथासाठीच्या काष्ठाचे (लाकडाचे) पूजन केले. अशा प्रकारे या दिव्य रथाचा प्रारंभ अध्यात्मातील अधिकारी विभूतींच्या शुभहस्ते करण्यात आला. या वेळी श्री. प्रकाश सुतार यांनी या शुभमुहूर्तावर या लाकडाचे प्रातिनिधिक ठोककाम केले. सनातनच्या पुरोहितांनी या वेळी श्रीविष्णुसहस्रनामाचे पारायण केले. या वेळी आम्हाला ‘ईश्वराचे नियोजन कसे असते ?’, हे शिकायला मिळाले.’ – सुश्री (कु.) अंजली क्षीरसागर (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
४ आ. रथसेवा निर्विघ्न होण्यासाठी पू. गुरुजींनी एक श्री गणेशमूर्ती बनवणे, ‘पुढे ही मूर्ती तुम्हाला मार्गदर्शन करील’, असे सांगणे आणि गणेशाला प्रार्थना केल्यावर सेवेतील अडचणी सुटणे : ‘पू. कवटेकरगुरुजी यांनी या वेळी मातीची श्री गणेशमूर्ती बनवून तिचे पूजन केले. श्री गणेशाच्या साक्षीनेच रथ बनवण्याचे कार्य चालू झाले. पू. गुरुजींनी सांगितले होते, ‘‘प्रतिदिन सेवा चालू करण्यापूर्वी श्री गणेशाच्या मूर्तीला नैवेद्य दाखवा. त्यानंतर तो प्रसाद रथाची सेवा करणार्या सर्व साधकांना द्या आणि नंतर सेवा चालू करा.’’ जणूकाही त्या प्रसादाच्या माध्यमातून आम्हाला प्रतिदिन शक्तीच मिळत होती. श्री गणेशाच्या कृपेने रथनिर्मितीचे कार्य अत्यंत निर्विघ्नपणे पार पडले. पू. गुरुजींनी मला सांगितले, ‘‘यापुढे हीच मूर्ती तुला मार्गदर्शन करील.’’ त्यानंतर जेव्हा आम्हाला सेवा करतांना अडचणी यायच्या, तेव्हा आम्ही श्री गणेशाला प्रार्थना केल्यावर अडचणी सुटत होत्या आणि योग्य दिशा (उपाय) मिळत होती. तेव्हा ‘श्री गणेशच सुचवत आहे’, असे आमच्या लक्षात येत होते.’
– श्री. प्रकाश सुतार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
‘पू. कवटेकरगुरुजी यांनी बनवलेल्या श्री गणेशाच्या मूर्तीला नमस्कार करतांना माझी भावजागृती झाली. रथाची निर्मिती श्री गणेशाच्या साक्षीनेच झाली. सेवेतील सर्व विघ्ने श्री गणेशानेच दूर केली.’ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ |
रथाच्या प्रतिकृतीच्या आत गेल्यावर तेथे श्रीविष्णुतत्त्वाचे अवतरण झाल्याचे जाणवणे‘साधकांनी रथाची प्रतिकृती तळमळीने आणि भावपूर्ण बनवली होती. रथाच्या प्रतिकृतीच्या आत गेल्यावर आणि तिच्यातून बाहेर आल्यावर मला वेगळे वाटत होते. तेथे त्याच वेळी श्रीविष्णुतत्त्वाचे अवतरण झाल्याचे मला जाणवले.’ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ |
५. रथनिर्मितीच्या कार्यातील विविध टप्पे
‘मधल्या काळात रथाचा आराखडा आणि मापे यांचा अभ्यास चालूच होता. संपूर्ण रथाच्या निर्मितीप्रक्रियेत सात्त्विकता आणि स्पंदनशास्त्र यांच्या दृष्टीने साधकांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला. रथशास्त्राच्या दृष्टीने पू. कवटेकरगुरुजी यांनी मार्गदर्शन केले.
५ अ. प्रथम रथाची मापे लक्षात घेऊन कागदावर आराखडे बनवण्यात आले.
५ आ. साधकांनी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून रथाची प्रतिकृती बनवणे आणि रथात बसण्यासाठी सोयीची जागा, चित्रीकरण आणि छायाचित्रे या दृष्टीने प्रतिकृतीचा अभ्यास करणे : रथाचा आराखडा अंतिम झाल्यावर आम्ही (सुतारसेवा, कला आणि चित्रीकरण यांच्याशी संबंधित सेवा करणार्या साधकांनी) एका रिकाम्या जागेत उपलब्ध असलेल्या साहित्यापासून रथाची एक प्रतिकृती बनवली होती. उदा. आराखड्यात ठरवलेल्या उंचीच्या आसंद्या वापरून ३ गुरूंसाठीची ३ आसने, तसेच पाईप वापरून रथाचे खांब बनवले आणि लाकडी पट्ट्यांच्या साहाय्याने रथाची जागा मोजली. अशा प्रकारे रथाच्या प्रतिकृतीचा (‘डमी सेट-अप’चा) अभ्यास करून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या तीनही गुरूंना रथात बसण्यासाठी ती जागा सोयीची आहे का ? चित्रीकरण अन् छायाचित्रे यांच्या दृष्टीने योग्य आहे का ? पुष्पार्चना आणि औक्षण करण्यासाठी, तसेच चित्रीकरण करण्यासाठी आवश्यक तेवढी जागा उपलब्ध आहे का ?’, असाही अभ्यास केला.
५ आ १. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितल्याप्रमाणे प्रयोग केल्यावर प्रतिकृतीच्या आत श्रीविष्णुतत्त्वाची निर्गुण स्पंदने आणि बाहेर वेगळी स्पंदने जाणवणे : ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी आम्हाला रथामध्ये श्री विष्णुतत्त्वाचे अवतरण झाल्याचे सांगितले, तसेच आम्हाला ‘प्रतिकृतीच्या आत आणि प्रतिकृतीच्या बाहेर काय जाणवते ?’, असा प्रयोग करायला सांगितला. प्रतिकृतीचा अशा प्रकारे अभ्यास करतांना आम्हा उपस्थित सर्वच साधकांना तेथे श्रीविष्णुतत्त्वाची अनुभूती आली. उभ्या केलेल्या चौकटीच्या आत गेल्यावर श्रीविष्णुतत्त्वाची निर्गुण स्पंदने जाणवायची आणि चौकटीच्या बाहेर वेगळी स्पंदने जाणवायची.’ – सौ. जान्हवी शिंदे, फोंडा, गोवा.
५ इ. रथाची लहान प्रतिकृती बनवणे : ‘रथाची मापे सोयीची आहेत’, याचा अभ्यास झाल्यानंतर अंतिम झालेल्या मापांनुसार पू. कवटेकरगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली लहान प्रतिकृती बनवण्यात आली. त्यामुळे आम्हाला ‘रथ प्रत्यक्षात साकार झाल्यावर तो कसा दिसेल ?’, त्याचा अभ्यास करता आला. – सौ. जान्हवी रमेश शिंदे, फोंडा, गोवा.
५ इ १. पू. कवटेकरगुरुजींनी साधकांकडून रथाची लाकडी प्रतिकृती १ दिवसात बनवून घेणे आणि नंतर साधकांना ‘रथ कसा असेल ?’, याचे चित्र स्पष्ट होणे : ‘पू. कवटेकरगुरुजींनी ‘आम्हाला चित्र स्पष्ट व्हावे’, यासाठी रथाची लाकडाची प्रतिकृती बनवून घेतली. ती प्रतिकृती बनवायला न्यूनतम ४ दिवस लागणार होते; पण आपल्याकडे तेवढा वेळ नव्हता. त्यांनी ती प्रतिकृती आमच्याकडून १ दिवसात बनवून घेतली. ‘प्रत्यक्ष रथ तयार करतांना लाकडे कशी जोडायची ? कोणते जोड पुढे आणि कोणते मागे यायला हवेत ? कोणते जोड वरून आणि कोणते खालून जोडायला हवेत ?’ इत्यादी सर्व बारकावे ही प्रतिकृती करतांना पू. गुरुजींनी आमच्याकडून करून घेतले. वयाच्या ८५ व्या वर्षीही त्यांची इतकी गती आहे की, त्यांच्या तुलनेत आम्ही पुष्कळ न्यून आहोत. विचार आणि कृती यांच्या स्तरावर त्यांच्याशी जुळवून घ्यायला आम्ही पुष्कळ अल्प पडत होतो, तरीही त्यांनी आमच्याकडून सेवा करून घेतली. ती प्रतिकृती बनवल्यावर आम्हाला ‘रथ कसा असेल आणि आपण तो कसे बनवू शकतो ?’, याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आणि आमचा रथ स्वतः बनवण्याचा आत्मविश्वास अधिकच वाढला.’ – श्री. प्रकाश सुतार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
‘रथाची लांबी १२ फूट ४ इंच, रुंदी साडे आठ फूट आणि एकूण उंची (घुमट धरून) साडे पंधरा फूट आहे.’ – श्री. प्रकाश सुतार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
५ ई. ‘त्यानंतर संगणकीय प्रणालीद्वारे रथाची त्रिमितीय (थ्री-डायमेंशनल) प्रतिकृती बनवण्यात आली.
५ उ. प्रत्येक भागाचे तपशीलवार चित्र काढणे आणि आकार अंतिम करणे
५ ऊ. लाकडाचे अंतिम आकार तयार करणे
५ ए. नक्षीकाम करणे
५ ऐ. प्रत्यक्ष जोडकाम करणे
५ ओ. विद्युत् जोडणी, रंगकाम आणि फिनिशिंग करणे
या सर्व टप्प्यांतून अभ्यास करून आणि त्यात विविध सुधारणा करून दिव्य रथ साकार झाला.
(क्रमश:)
– सौ. जान्हवी रमेश शिंदे, सनातन आश्रम, फोंडा, गोवा.
(सर्व सूत्रांचा दिनांक : १६.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या / साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |