कणकवली (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील सात्त्विकतेची आवड असलेली कु. धानी नायडू (वय ७ वर्षे) हिने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
कणकवली (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील कु. धानी नायडू (वय ७ वर्षे) हिची तिच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
१. गर्भारपणात
१ अ. ‘धानीच्या जन्मापूर्वी मला स्वप्नामध्ये सातत्याने देवीची मंदिरे दिसत असत, तसेच काही वेळा शिवपिंडीही दिसत असे. स्वप्नामध्ये मंदिर दिसत असतांना त्यामध्ये मला २ सुंदर बालके दिसत असत.
१ आ. मी ‘श्री दुर्गासप्तशती’ हा ग्रंथ आणि देवतांची पुस्तके वाचत असे.
१ इ. मी रात्रंदिवस प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकत असे.
१ ई. मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आवाजातील साधनेविषयीच्या ध्वनीचकत्या ऐकायचे. त्या वेळी माझ्या मनात ‘गर्भातील बाळाने केवळ ‘परम पूज्य डॉक्टर’, हाच नामजप करावा’, असा विचार सातत्याने येत होता.
१ उ. नवरात्रीत देवीचे दर्शन होणे, देवीची सेवा करण्याची संधी मिळणे आणि ‘बाळाला देवतांचे आशीर्वाद मिळत असून ते नामजप करत आहे’, असे जाणवणे : आमच्या कणकवली (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील घराच्या बाजूलाच मंदिर होते. मला प्रतिदिन मंदिरामध्ये होणारे मंत्रपठण आणि आरती ऐकू येत असे. आमच्या घराच्या सभोवतालचे वातावरण पुष्कळ सात्त्विक होते. त्यामुळे माझे मन पुष्कळ आनंदी होते. त्यानंतर मला नवरात्रीमध्ये देवीचे दर्शन झाले. मी नवरात्रीत देवीचे स्तोत्र वाचले आणि मला देवीची सेवा करण्याची संधी मिळाली. ‘माझ्या बाळाला देवतांचे आशीर्वाद मिळत आहेत’, असेे मला सातत्याने जाणवत होते. त्या वेळी ‘माझे बाळही नामजप करत आहे’, असे मला जाणवत होते.
२. प्रसुतीच्या २ दिवस आधी एका तेजस्वी स्त्रीने स्वप्नात येऊन मुलगी होणार असल्याचे सांगणे आणि तसेच होणे : माझ्या प्रसुतीचा दिनांक जवळ आला होता. तेव्हा ‘मला मुलगा होणार आहे’, असे मला जाणवत होते. मी पुष्कळ आनंदी होते; पण प्रसुतीच्या २ दिवस आधी पहाटेे ३.३० वाजता मला एक स्वप्न पडले. मला स्वप्नामध्ये एक स्त्री दिसली. तिने भगवे वस्त्र धारण केले होते. ती देवीप्रमाणे तेजस्वी दिसत होती. ती मला म्हणाली, ‘तुला मुलगी होणार आहे’ आणि त्याप्रमाणेच झाले.
३. बाळाच्या जन्माच्या वेळी
अ. बालिकेच्या जन्मानंतर परिचारिकेने तिला भगव्या रंगाच्या वस्त्रामध्ये गुंडाळले होते. त्या कपड्यांमध्ये ती पुष्कळ तेजस्वी दिसत होती.
आ. धानीचा जन्म झाला, तेव्हा तिच्या डोक्यावर पुष्कळ केस होते आणि तिला एक शेंडीही होती. तिच्या डोक्यावर अजूनही शेंडी आहे. आता तिचे केस वाढले असले, तरी ती शेंडी प्रकर्षाने उठून दिसते.
इ. तिच्या जन्मानंतर माझ्या मनाला एक प्रकारची स्थिरता आली होती. ‘तिचे सर्व करत असतांना ‘मी बाळकृष्णाची सेवा करत आहे’, असे मला वाटत होते.
४. जन्म ते १ मास
४ अ. संतांचे आशीर्वाद मिळणे : ती १ मासाची असतांना कणकवली (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे संतांचा भव्य मेळावा आयोजित केला होता. मी धानीला घेऊन संतांच्या दर्शनासाठी घराबाहेर थांबले होते. तेव्हा अनेक संतांनी तिच्या जवळ येऊन तिला आशीर्वाद दिले.
५. वय १ ते ४ वर्षे
५ अ. धानी २ वर्षांची असतांना आम्ही गुरुपौर्णिमेसाठी रामनाथी आश्रमामध्ये गेलो होतो. तेव्हा तेथे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी धानीला पहाताच उचलून घेतलेे आणि तिची पापी घेतली.
५ आ. पशू-पक्ष्यांशी बोलणे : धानी २ – ३ वर्षांची असतांना तिला पहाताक्षणी १० – १२ गायी आमच्या घराच्या फाटकाजवळ यायच्या. धानी त्यांच्याशी तिच्या भाषेत बोलत रहायची आणि त्या गायीही मान डोलवायच्या. प्रतिदिन सायंकाळी ६.३० वाजता धानीच्या झोपण्याच्या खोलीजवळील मार्गिकेत २ पक्षी नेहमी यायचे आणि तिच्याशी थोडा वेळ काहीतरी बोलून निघून जायचे. ती सांगते, ‘‘सर्व पशू-पक्षी परात्पर गुरु डॉक्टरांचे आहेत. आपण त्यांच्यावर प्रेम केले, तर तेसुद्धा आपल्यावर प्रेम करतात.’’
५ इ. आम्ही तिला फिरायला घेऊन गेलो असता तिला पहाताच अनेक लोक आकर्षित होऊन तिच्या जवळ येतात. ते तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात.
५ ई. प्रेमभाव : ती सर्वांशी प्रेमाने बोलते. एखाद्या व्यक्तीची ओळख नसेल, तरी ती त्या व्यक्तीला प्रेमाने हाक मारते आणि तिच्याशी प्रेमाने बोलतेे. जेव्हा ती साधकांशी बोलते, तेव्हा ‘ती त्यांना अनेक जन्मांपासून ओळखत आहे’, असे वाटते.
५ उ. देवतांची स्तोत्रे एकदा ऐकल्यावर ती जशीच्या तशी स्पष्ट शब्दांमध्ये म्हणण्याचा प्रयत्न करते.
५ ऊ. उत्तम निरीक्षणक्षमता : ती प्रत्येक गोष्टीचे बारकाईने निरीक्षण करते आणि त्यावर अनेक प्रश्न विचारते. वर्ष २०२१ मध्ये आम्ही सद़्गुरु स्वाती खाडये यांना भेटायला कुडाळ सेवाकेंद्रात गेलो होतो. तेव्हा तिने सेवाकेंद्राचे निरीक्षण केले. तिने सद़्गुरु स्वातीताईंना सांगितले, ‘‘सेवाकेंद्रात पुष्कळ चैतन्य आणि सात्त्विकता आहे. तसे आमच्या घरामध्ये नाही.’’
५ ए. कुणी रुग्णाईत असेल, तर ती त्यांना कापूर आणि अत्तर लावण्यास देते, तसेच त्यांच्या जवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र ठेवते.
६. वय ४ ते ६ वर्षे
६ अ. सात्त्विकतेची आवड
१. तिला लहानपणापासूनच अध्यात्माची पुष्कळ आवड आहे. परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र असलेले पदक तिने गळ्यात घातलेले आहे. एकदा एक व्यक्ती तिला म्हणाली, ‘हे पदक गळ्यात घालू नकोस.’ त्यावर धानी त्या व्यक्तीला म्हणाली, ‘‘हे माझे परम पूज्य आहेत. मी हे पदक घालणारच.’’
२. प.पू. भक्तराज महाराज यांंची भजने ऐकून ती त्यांवर ठेका धरून नाचते.
३. ती ‘देवघरात येऊन पूजा करणे, टाळ वाजवून आरती करणे, तुळशीला पाणी घालणे, सूर्यदेवतेला जल अर्पण करणे’, या कृती नियमित करते.
४. तिला ‘देवासमोर साष्टांग नमस्कार घालणे, सात्त्विक कपडे परिधान करणे’, या गोष्टी पुष्कळ आवडतात. ती लहानपणापासूनच मोठ्यांच्या पायांवर डोके ठेवून नमस्कार करते. या कृती तिला लहानपणी शिकवाव्या लागल्या नाहीत. ती सहजतेने कृती करत गेली.
५. तिला लहानपणापासून कालीमाता पुष्कळ आवडायची. ती कालीमातेचा नामजप भावपूर्ण करते. तिला स्वप्नामध्ये कालीमाता दिसते.
६ आ. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता
१. आम्ही तिला लहानपणी बाहेर घेऊन जायचो. तेव्हा एखाद्या ठिकाणी तिला त्रास जाणवत असेल, तर ती गळ्यातील परात्पर गुरु डॉक्टरांचे पदक हातात धरून जोरजोरात रडत असे.
२. ती २ – ३ वर्षांची असतांना आमच्या गोव्यातील घरामध्ये छोट्या बाळाचे चित्र (पोस्टर) लावले होते. त्याकडे बघून ती पुष्कळ चिडायची. तिने रडून ते चित्र काढायला लावले. त्या चित्राकडे पाहून ती ‘इथे भूत आहे’, असे म्हणत असे.
३. एका पंडितांनी माझ्या दिरांना गळ्यामध्ये घालण्यासाठी एक रुद्राक्ष दिला होता. एकदा तोे त्यांच्याकडून हरवला. आम्ही पुष्कळ शोधूनही तो सापडला नाही. तेव्हा त्यांनी धानीला सहज विचारले, ‘‘रुद्राक्ष कुठे असेल ?’’ तेव्हा तिने ते अचूक सांगितले.
४. ‘तिला देवता दिसतात आणि त्या तिच्याशी सूक्ष्मातून बोलतात’, असे ती सांगते.
६ इ. ज्योतिषांनी सांगितलेले कु. धानी हिचे भविष्य
१. एका ज्योतिषांनी तिची पत्रिका पाहून सांगितले होते, ‘‘ही मुलगी अध्यात्मात पुष्कळ प्रगती करील. ही तुमच्या घराण्यामध्ये सर्वांपेक्षा अधिक साधना करील.’’
२. ज्योतिष विशारद सौ. प्राजक्ता संजय जोशी यांनी कु. धानी हिची पत्रिका सिद्ध केली होती. त्यामध्ये त्यांनी लिहिले होते, ‘ती अध्यात्मात पुष्कळ प्रगती करील. तिला अध्यात्म आणि शोधकार्य यांची आवड असेल.’’
६ ई. भाव
१. परात्पर गुरु डॉक्टर आणि सद़्गुरु स्वाती खाडये यांच्याविषयी बोलत असतांना तिचा भाव दाटून येतो.
२. ती कोणत्याही विषयाच्या संदर्भात बोलतांना त्यात परात्पर गुरु डॉक्टरांचा उल्लेख करते. तिला ‘तू मोठेपणी कोण होणार ?’, असे विचारल्यावर ती म्हणते, ‘‘मला गोपी होऊन परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांजवळ रहायचे आहे.’’
३. ती परात्पर गुरु डॉक्टरांवर गाणी सिद्ध करते आणि भांड्यांवर ताल धरून भावपूर्ण म्हणते.
७. कु. धानीच्या जन्मानंतर आलेल्या अनुभूती
अ. माझ्या गर्भाशयात गाठ (फायब्रॉईड) होती. आधुनिक वैद्यांनी मला प्रसुती झाल्यानंतर शस्त्रकर्म करायला सांगितले होते; पण धानीचा जन्म झाल्यानंतर ती गाठ नष्ट झाली. मला शस्त्रकर्म करण्याची आवश्यकता भासली नाही.
आ. परिस्थिती कितीही बिकट असली, तरी त्या परिस्थितीमध्ये मला सकारात्मक रहाता येतेे.
इ. पूर्वी मला साधना करण्यास काही अडचणी येत असत; पण जसजशी धानी मोठी होऊन साधना करू लागली, तशा अडचणी न्यून झाल्या. गुरुदेवांच्या कृपेमुळे आज मी समाजामध्ये जाऊन समष्टी सेवा करू शकते.
ई. माझी गुरुदेवांप्रती श्रद्धा वाढण्यास साहाय्य झाले.
उ. धानीविषयी लिहित असतांना मला कागदावर सोनेरी रंगाचे दैवी कण दिसत होते.
८. कु. धानीचे स्वभावदोष : हट्ट करणे आणि घरामध्ये असतांना पुष्कळ मस्ती करणे
‘हे गुरुदेवा, ‘आपणच मला धानीची गुणवैशिष्ट्ये लिहिण्याची संधी दिलीत’, त्याबद्दल मी तुमच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते. हे गुरुदेवा, ‘या बाळाला अखंड तुमच्या चरणी लीन ठेवा. या बाळाकडून तुम्हीच साधना करून घ्या’, अशी तुमच्या कोमल चरणी प्रार्थना करते.’
– सौ. विजया कुणाल नायडू (कु. धानीची आई), कणकवली, (जिल्हा सिंधुदुर्ग) (६.४.२०२३)