पोर्तुगिजांच्या पाऊलखुणा नष्ट करून नवीन गोवा सिद्ध करा !

बेतुल किल्ल्यावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे गोमंतकियांना आवाहन

बेतुल किल्ल्यावरील सोहळ्यात मंत्री गोविंद गावडे, मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि मंत्री सुभाष फळदेसाई

पणजी, ६ जून (वार्ता.) – गोव्याला स्वतंत्र होऊन ६० वर्षे पूर्ण झाली असून आतातरी आपण पोर्तुगिजांच्या राजवटीतील पाऊलखुणा नष्ट करून नवीन गोवा सिद्ध केला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. बेतुल किल्ल्यावर ६ जून या दिवशी आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे आवाहन केले. या सोहळ्याला पुरातत्व विभागाचे मंत्री सुभाष फळदेसाई, कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, स्थानिक आमदार ॲल्टन डिकोस्टा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यंदा ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा पुरातत्व विभाग आणि कला अन् संस्कृती संचालनालय यांच्या माध्यमातून राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपण पोर्तुगीज राजवटीच्या पाऊलखुणा नष्ट करून नवीन गोवा सिद्ध करण्यासाठी कटीबद्ध होऊया. बेतुल येथील २ सहस्र ५०० चौ.मी. भूमी सीमाशुल्क खात्याकडून (कस्टम्स) पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे आणि या ठिकाणी किल्ल्याची प्रतिकृती बनवण्यात येणार आहे.’’