गोवा : वर्ष २०१२ पासून आतापर्यंत मंत्र्यांसाठी ७ कोटी रुपये खर्चून ३६ ‘एस्.यु.व्ही.’ वाहनांची खरेदी
(‘एस्.यु.व्ही.’ – स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल – क्रीडा प्रकारांसाठी वापरायोग्य वाहन)
पणजी, ६ जून (वार्ता.) – गोवा सरकारने वर्ष २०१२ पासून आतापर्यंत ७ कोटी ५ लाख रुपये खर्चून ३६ ‘एस्.यु.व्ही.’ वाहनांची खरेदी केली आहे. वर्ष २०१२-१७ या कालावधीत मंत्र्यासाठी २ कोटी २ लाख रुपये खर्चून १५ ‘एस्.यु.व्ही.’ चारचाकी वाहने खरेदी करण्यात आली आणि यामध्ये १० ‘इनोवा’, १ ‘फॉर्च्युनर’ आणि प्रत्येकी १५ लाख रुपयांहून अल्प किमतीच्या अन्य ४ निरनिराळ्या ‘ब्रँड’च्या वाहनांचा समावेश आहे. वर्ष २०१२ ते २०१७ या काळात तत्कालीन मंत्री स्व. फ्रान्सिस डिसोझा, माजी मंत्री महादेव नाईक, तत्कालीन मंत्री तथा विधानसभेचे विद्यमान सभापती रमेश तवडकर यांनी २ नवीन वाहने खरेदी केली. या कालावधीत मिकी पाशेको यांनी मंत्रीपदावर असूनही सरकारी वाहन घेतले नाही. वर्ष २०१७ ते २०२२ या कालावधीत मंत्र्यांसाठी २ कोटी ७७ लाख रुपये खर्चून १४ सुसज्ज वाहने घेण्यात आली. यामध्ये १२ इनोवा क्रिस्टा, स्व. मनोहर पर्रीकर यांची ‘हुंडाय टक्सन’ आणि मंत्री मावीन गुदिन्हो यांची ‘एम्.जी. ग्लोस्टर’ यांचा समावेश आहे.
(सौजन्य : Prudent Media Goa)
माजी नेते बाबू कवळेकर यांनी विरोधी पक्षनेते म्हणून एक इनोवा आणि उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यावर दुसरे इनोवा वाहन खरेदी केले. मंत्री मावीन गुदिन्हो यांनी पहिल्यांदा ‘इनोवा’ वाहन खरेदी केले आणि वाहन खरेदी करण्यासाठी पैशांची मर्यादा वाढवल्यानंतर ३६ लाख रुपये किमतीचे ‘एम्.जी. ग्लोस्टर’ हे वाहन खरेदी केले. या कालावधीत ‘गोवा फॉरवर्ड’चे विजय सरदेसाई, मंत्री रोहन खंवटे, भाजपच्या आमदार जेनिफर मोन्सेरात आणि सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी सरकारी वाहन वापरले नाही. पूर्वी वर्ष २०१७ च्या नियमानुसार मंत्र्यांना १७ लाख ५० सहस्र रुपये, तर मुख्यमंत्री आणि सभापती यांना २१ लाख रुपये किमतीपर्यंत वाहन खरेदी करता येत होते. वर्ष २०२० मध्ये सरकारने मंत्र्यांना वाहन खरेदी करण्यासाठीच्या किमतीच्या मर्यादेत वाढ करून ती ३० लाख रुपये, तर मुख्यमंत्री आणि सभापती यांच्यासाठी ३५ लाख रुपये केली. मर्यादा ३० लाखपर्यंत केल्यानंतर मंत्र्यांनी ‘इनोवा’ वाहन खरेदी करण्याऐवजी त्याहून महागडी वाहने खरेदी करण्यास प्रारंभ केला आहे. मर्यादा वाढवल्यानंतर मंत्र्यांनी ७ महागडी वाहने घेतली आणि यामध्ये २ ‘किया कार्निव्हल’, ३ ‘फॉर्च्युनर’, १ ‘जीप मेरीडियन’ घेण्यात आल्या. मुख्यमंत्री डॉ. सावंत, मंत्री बाबूश मोन्सेरात आणि वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी ३५ लाख रुपये किमतीचे ‘फॉर्च्युनर’ वाहन खरेदी केले. नव्याने मंत्रीपदी आरूढ झाल्यानंतर प्रत्येक मंत्री नवीन वाहन आणि वाहनासाठी त्यांच्या पसंतीचा नोंदणी क्रमांक घेत असतो.