सांगली जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था यांची परिस्थिती गंभीर !
आमदार सुधीर गाडगीळ यांचे पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप
सांगली – गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था यांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी खून आणि दरोडा यांच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. भरदिवसा दरोडे पडत आहेत. लूटमार केली जात आहे. स्त्रियांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. सांगली जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर असून त्याला उत्तरदायी असलेल्या अधिकार्यांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना सादर केले. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी ‘संबंधितांवर कठोर कारवाई करू’, असे आश्वासन दिले.
उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१. सांगलीत नशेखोरीचे प्रमाण वाढले असून तरुण नशा करून चोरी-लूटमार करत आहेत. या घटनांमुळे जिल्ह्यात नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
२. ४ जून या दिवशी भरदिवसा सांगलीत ‘रिलायन्स ज्वेल्स’वर दरोडा पडला. हे दुकान जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. या घटनेच्या काही दिवस अगोदरच कवठेसप्तर्षी येथेही दरोड्याची मोठी घटना घडली आहे. शिराळा तालुक्यातील निगडी येथेही दरोडा टाकून वृद्ध दांपत्यांना जिवे मारण्यात आले.
३. काही दिवसांपूर्वी मिरज येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला.
४. मटका आणि सट्टा यांचे प्रमाण वाढले आहे. अनेक महाविद्यालयीन तरुण-तरुणी महाविद्यालयात, तसेच आसपासच्या उपाहारगृहात ‘नशा’ करतात.
५. खासगी सावकारी मोठ्या प्रमाणात वाढली. बनावट २ सहस्र रुपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या; मात्र याच्या मुख्य सूत्रधारांस अद्याप अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही.
६. गेल्या काही दिवसांत मिरज येथे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा इतका बोजवारा उडालेला असतांना पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. पोलिसांचा कसलाही वचक राहिलेला नाही. पोलिसांच्या या निष्क्रीयतेच्या विरोधात लोकांनी आंदोलने करण्यास प्रारंभ केला आहे.
संपादकीय भूमिकाआमदारांनी कायदा-सुव्यवस्थेच्या दुःस्थितीविषयी पोलिसांना जाणीव करून देणेे, हे पोलीस प्रशासनाचे अपयश ! |