जर्मनीतील प्रशिक्षक राज्यातील क्रीडा शिक्षकांना फूटबॉलचे प्रशिक्षण देणार ! – रणजीत सिंह देओल, प्रधान सचिव, क्रीडा विभाग, महाराष्ट्र
जर्मनीच्या दौर्यानंतर राज्याच्या क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ला दिली माहिती !
मुंबई, ४ जून (वार्ता.) – महाराष्ट्रात फूटबॉलचा प्रसार होण्यासाठी राज्यातील क्रीडा शिक्षकांना प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत. जर्मनीच्या क्रीडा विभागाशी याविषयी चर्चा चालू आहे. जर्मनीतील प्रशिक्षक महाराष्ट्रातील क्रीडा शिक्षकांना फूटबॉलचे प्रशिक्षण देणार आहेत, अशी माहिती राज्याच्या क्रीडाविभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली. महाराष्ट्रात फूटबॉल या खेळाचा प्रसार आणि प्रचार व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने जर्मनीमधील ‘फूटबॉल क्लब बायर्न’ या जगप्रसिद्ध संस्थेशी ‘सहकार्य करार’ केला आहे. या अंतर्गत नुकतेच महाराष्ट्राचे क्रीडमंत्री गिरीश महाजन, रणजीत सिंह देओल यांनी २० विद्यार्थ्यांसमवेत जर्मनीचा दौरा केला. या दौर्यानंतर महाराष्ट्रात फूटबॉलचा प्रसार करण्याचे धोरण कसे राबवले जाणार ? याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधी रणजीत सिंह देओल यांच्याशी संवाद साधला. तेव्हा ते बोलत होते.
राज्यात उत्तम दर्जाची क्रीडा केंद्रे उभारणार आहोत !
महाराष्ट्रात फूटबॉलचे प्रशिक्षण देणारी उत्तम दर्जाची क्रीडा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. फूटबॉलचा प्रसार करण्यासाठी शासनाला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. यासाठी निधीची तरतूद होणे आवश्यक आहे. क्रीडामंत्री याविषयी लवकरच शासनाला अहवाल सादर करतील. महाराष्ट्रातील क्रीडा प्रशिक्षकांना प्रशिक्षित केल्यास महाराष्ट्रात फूटबॉल या खेळाचा प्रसार करता येऊ शकेल. राज्यातील परंपरागत खेळांना प्रोत्साहन देणे, हे शासनाचे धोरण आहे. राज्यात त्या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येत आहेत, असे रणजीत सिंह देओल यांनी सांगितले. राज्यात बोगस क्रीडा प्रमाणपत्रांच्या समस्येविषयी बोलतांना प्रमाणपत्र पडताळण्याचे सॉफ्टवेअर सिद्ध करण्याची प्रक्रिया चालू असल्याचेही त्यांनी सांगितले.