सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना प्रदान केलेल्या ‘उत्तराधिकार पत्रा’तील वचनांचा उलगडलेला भावार्थ !
‘११.५.२०२३ या दिवशी गोवा येथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा दिव्य ‘ब्रह्मोत्सव’ पार पडला. त्यामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना ‘उत्तराधिकार पत्र’ प्रदान केले. त्यानंतर श्री. विनायक शानभाग यांनी त्या पत्रातील लिखाण सर्व साधकांना वाचून दाखवले. ते ऐकतांना ‘उत्तराधिकार पत्रातील लिखाण म्हणजे ईश्वरी वाणीच आहे’, असे जाणवले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी उत्तराधिकार पत्रात लिहिलेल्या वचनांचा मला लक्षात आलेला भावार्थ पुढे दिला आहे.
१. ‘सनातन धर्म’ हेच माझे नित्यरूप आहे. त्या रूपाने मी सर्वत्र सदा आहे’, या वचनाचा भावार्थ
धर्म म्हणजे स्वभाव, उदा. व्यापकत्व, हलकेपणा आदी सत्त्वगुणाचे धर्म आहेत, तर संकुचितपणा, जडत्व आदी तमोगुणाचे धर्म आहेत. अशा शाश्वत धर्मतत्त्वांवर संपूर्ण विश्व आधारलेले आहे, तसेच अशा धर्मतत्त्वांना अनुसरून भारतीय ऋषिमुनींनी धर्मशास्त्राची रचना केली आहे. त्याला आपण ‘सनातन धर्म’ म्हणतो. सनातन धर्माच्या आचरणाने मनुष्याची भौतिक आणि आध्यात्मिक उन्नती होते. सनातन धर्म हे ईश्वराचे रूप आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे ईश्वरस्वरूप आहेत. त्यामुळे त्यांनी ‘सनातन धर्म माझे नित्यरूप’ असे म्हटले आहे. जिथे-जिथे सनातन धर्म आहे, तिथे-तिथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे तत्त्वरूपाने विराजमान आहेत.
२. ‘जशी वेदांची ‘श्रुति’ आणि ‘स्मृति’ नावांची दोन अंगे आहेत, त्याचप्रमाणे माझी दोन अंगे म्हणजे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ होय’, या वचनाचा भावार्थ
२ अ. श्रुति आणि स्मृति : वेद ही ईश्वराची वाणी आहे. या ईश्वरी वाणीचे ऋषींनी ध्यानावस्थेत श्रवण केले, म्हणून वेदांना ‘श्रुति’ म्हटले जाते. ‘वेदांमधील मंत्रांचा गूढ अर्थ समजून घेतल्यास शाश्वत धर्मतत्त्वांचे ज्ञान प्राप्त होते’, असे वेदांचे अभ्यासक सांगतात. स्मृति म्हणजे वेदांचे स्मरण करून म्हणजे वेदांमधील ज्ञानाचे मनन-चिंतन करून लोककल्याणासाठी ऋषींनी निर्माण केलेले धर्मशास्त्र. ‘मनुष्याने धर्माला अनुकूल असे जीवन कसे जगावे ?’, यासंबंधीचे नियम स्मृतीग्रंथांत दिलेले आहेत.
२ आ. सूर्यनाडी आणि चंद्रनाडी : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘माझे दोन उत्तराधिकारी म्हणजे माझी दोन अंगे आहेत’, असे म्हटले आहे. योगशास्त्रानुसार व्यक्तीच्या शरिराच्या उजव्या बाजूला सूर्यनाडी अन् डाव्या बाजूला चंद्रनाडी असते. सूर्यनाडी ही प्रखर असून तेज, ज्ञान आणि बुद्धी देते, तर चंद्रनाडी ही सौम्य असून सुख, सौंदर्य आणि स्नेह देते. सूर्यनाडी ही रक्षणकर्ती असून चंद्रनाडी ही पोषणकर्ती आहे. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या सूर्यनाडीस्वरूप आहेत, तर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या चंद्रनाडीस्वरूप आहेत. त्यांच्या रूपात विश्वाची दोन मूलभूत तत्त्वे ‘अग्नि’ (सूर्य) आणि ‘सोम’ (चंद्र) ही एकत्र आली आहेत.
३. ‘माझ्यानंतर सनातन धर्माचे रक्षण करण्याचे कार्य त्या दोघी करणार आहेत’, या वचनाचा भावार्थ
भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे की, सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी तो स्वतः अवतार घेतो. ‘धर्मसंस्थापना करणे’ हे अवतारांचे कार्य असते. वरील वचनाद्वारे ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ हे तिन्ही गुरु अवतारी आहेत’, याची प्रचीती येते !
४. ‘ज्याप्रमाणे ‘श्रुति’ आणि ‘स्मृति’ हे ‘शब्दप्रमाण’ आहेत, त्याप्रमाणे श्रीसत्शक्ति आणि श्रीचित्शक्ति यांचा प्रत्येक शब्द म्हणजे माझा शब्द आहे’, या वचनाचा भावार्थ
या वचनाद्वारे ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ हे तिन्ही गुरु तत्त्वरूपाने एकच आहेत’, हे लक्षात येते. स्थूल दृष्टीने पाहिल्यास तिन्ही गुरूंचे देह, प्रकृती आणि कार्याचे पैलू निरनिराळे आहेत; पण सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यास तिन्ही गुरूंच्या ठायी असलेली ईश्वरी शक्ती एकच आहे.
५. ‘माझ्या नंतर येणार्या काळात सनातन संस्थेचे सद़्गुरु, संत, श्रद्धावंत साधक, भक्त यांचे रक्षण, परिपालन आणि आध्यात्मिक उन्नती करण्याचा अधिकार (क्षमता) श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना सोडून अन्य कुणालाही नाही’, या वचनाचा भावार्थ
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे ‘गुरुकृपायोगा’चे जनक आहेत. ‘शिष्याची आध्यात्मिक उन्नती गुरूंच्या कृपेने होते’ हा गुरुकृपायोगाचा मूलभूत सिद्धांत आहे. गुरूंना अपेक्षित असे कर्म केल्याने शिष्यावर गुरूंची कृपा होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्या नंतर साधकांची आध्यात्मिक उन्नती करण्याचा अधिकार श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना दिला आहे. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी चालू केलेला ‘धर्मयज्ञ’ त्यांच्या नंतर शांत होणार नाही, तर अव्याहत चालूच राहील !
६. ‘जसे वेद चिरंतन आहेत, तसे माझे हे शब्द चिरंतन आहेत’, या वचनाचा भावार्थ
वेद ही ईश्वराची वाणी आहे. ईश्वर ‘सत्त्व, रज आणि तम’ या त्रिगुणांच्या पलीकडे असल्याने अविनाशी आहे. त्यामुळे त्याची वाणीसुद्धा अविनाशी आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे ईश्वरस्वरूप असल्याने त्यांनी ‘माझे हे शब्द चिरंतन आहेत’, असे म्हटले आहे. गीतेत भगवान श्रीकृष्णाने ज्याप्रमाणे तो साक्षात् ‘परब्रह्म’ असल्याचे अर्जुनाला वेळोवेळी सांगितले आहे, त्याप्रमाणे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी या उत्तराधिकार पत्रामध्ये ते साक्षात् ‘परब्रह्म’ असल्याचे संकेत प्रत्येक वाक्यागणिक दिले आहेत. हे उत्तराधिकार पत्र दिव्य आणि अलौकिक असून सनातन संस्थेचा अनमोल ठेवा आहे !
कृतज्ञता
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा अद्वितीय आणि अलौकिक असा ‘ब्रह्मोत्सव’ पहाण्याची आणि ‘उत्तराधिकार पत्र’ श्रवण करण्याची संधी मिळाली’, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२७.५.२०२३)