निलंबित पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांना अटक !

गडचिरोली येथील न्‍यायाधिशांना धमकी दिल्‍याचे प्रकरण !

प्रतिकात्मक चित्र

गडचिरोली – गुन्‍हे नोंद करण्‍याचे आदेश देणार्‍या न्‍यायाधिशांना धमकावल्‍याप्रकरणी येथील निलंबित पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांना पोलिसांनी २ जूनच्‍या रात्री अटक केली. त्‍यांची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्‍यात आली आहे. (अशा पोलीस अधिकार्‍यांना जनतेचे रक्षणकर्ते म्‍हणता येईल का ? असे पोलीस जनतेशी कसे वागत असतील, याची कल्‍पनाच न केलेली बरी ! – संपादक)

चामोर्शी कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या निवडणुकीच्‍या वेळी २० एप्रिलच्‍या पहाटे पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी माजी सभापती अतुल गण्‍यारपवार यांना अमानुष मारहाण केली होती. या संदर्भात गण्‍यारपवार यांनी पोलीस ठाण्‍यात तक्रारही केली होती; परंतु गुन्‍हा नोंद न झाल्‍याने गण्‍यारपवार यांनी चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्‍याय दंडाधिकार्‍यांच्‍या न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट केली होती. सुनावणीच्‍या वेळी प्रथमवर्ग न्‍यायदंडधिकारी एन्.डी. मेश्राम यांनी पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांच्‍यावर गुन्‍हा नोंदवण्‍याचे आदेश २० मे या दिवशी दिले होते.

आदेशानंतर संतप्‍त झालेले पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी २५ मे या दिवशी सकाळी न्‍यायाधीश मेश्राम यांच्‍या बंगल्‍यावर जाऊन त्‍यांना शिवीगाळ करत हुज्‍जत घातली. या प्रकरणी न्‍यायाधीश मेश्राम यांनी तक्रार केली. चामोर्शी पोलिसांनी खांडवे यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा नोंद केला. दुसर्‍या दिवशी खांडवे यांना निलंबित करण्‍यात आले. नंतर खांडवे हे नागपूर येथे चिकित्‍सालयात भरती होते.२ जून या दिवशी ते गडचिरोली येथे आल्‍याची माहिती मिळताच पोलिसांनी त्‍यांना अटक केली.