ओडिशा अपघातस्थळावरील रेल्वे वाहतूक ५१ घंट्यांनी पूर्ववत् !
भुवनेश्वर/बालासोर (ओडिशा) – बालासोर येथील रेल्वे अपघातस्थळाच्या रुळांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून ४ जूनच्या रात्री उशिरा रेल्वेगाड्यांची वाहतूक पूर्ववत् झाली. रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव हे २ जूनपासून बालासोरमधील बहनगा बाजार स्थानकावरच थांबले होते. त्यांनी साहाय्य आणि दुरुस्ती यांचे काम पाहिले. अपघातानंतर ५१ घंट्यांनी जेव्हा पहिली रेल्वे रुळावरून मार्गस्थ झाली, तेव्हा रेल्वेमंत्री हात जोडून उभे होते. ते म्हणाले की, आमचे दायित्व अजून संपलेले नाही. ‘हरवलेल्या लोकांना शोधणे, हे आमचे ध्येय आहे’, असे म्हणत ते भावूक झाले.
सेवा पूर्ववत:ओडिशा रेल्वे अपघात ट्रॅक 51 तासांनंतर दुरुस्त, वाहतूक पूर्ववत; 48 तासांनंतर जिवंत सापडला तरुण#OdishaRailTragedy #PMModi #Odisha #IndianRailways https://t.co/ppkbaIHEJS
— Divya Marathi (@MarathiDivya) June 5, 2023
अपघाताच्या ४८ घंट्यांनंतर ४ जूनच्या रात्री घटनास्थळी एक प्रवासी जिवंत सापडला. अपघाताच्या वेळी तो डब्यातून बाहेर फेकला गेला आणि जवळ असलेल्या झुडपात पडून बेशुद्ध झाला. ‘दिलाल’ असे त्याचे नाव असून तो आसामचा रहिवासी आहे.
ओडिशा सरकारचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी दावा केला आहे की, या अपघातात २८८ नव्हे, तर २७५ जणांचा मृत्यू झाला आहे. काही मृतदेहांची दोनदा मोजणी करण्यात आली असून मृतांच्या संख्येत तफावत आहे. या अपघातात १ सहस्त्र १७५ जण घायाळ झाले असून त्यांपैकी ७९३ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
१४ वर्षांपूर्वी कोरोमंडल एक्सप्रेस ओडिशातच रुळावरून घसरली होती !१४ वर्षांपूर्वी, म्हणजे १३ फेब्रुवारी २००९ या दिवशी कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाला होता. तो अपघातही सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारासच झाला होता. रेल्वेगाडी जाजपूर रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात होती. त्या वेळी ती चुकीच्या मार्गावर गेली असता तिचे ८ डबे उलटले. या अपघातात १६ प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर ४० हून अधिक जण घायाळ झाले होते. |