गोवा : सडलेल्या तांदुळाचे वितरण करणार्या संस्थेचे कंत्राट रहित
पणजी, ४ जून (वार्ता.) – सासष्टी आणि मुरगाव तालुक्यांतील शिधापत्रिकाधारकांना सडलेल्या तांदुळाचे वितरण केल्याच्या प्रकरणी सरकारने तांदुळाचे सरकारी गोदामात योग्यरित्या निगा न राखल्यावरून संबंधित संस्थेचे कंत्राट रहित केले आहे. त्याचप्रमाणे नागरी पुरवठा खात्याचे निरीक्षक आणि गोदामाचे दायित्व असलेले अधिकारी यांच्या कामात पालट करून त्यांना कारकुनी काम देण्यात आले आहे.
सरकारच्या नागरी पुरवठा खात्याने यापूर्वी खात्याचे संबंधित निरीक्षक आणि गोदामाचे अधिकारी यांना तांदुळाच्या साठवणुकीत झालेल्या गलथान कारभारासंबंधी स्पष्टीकरण मागितले होते. खात्यातील सूत्रानुसार संबंधित अधिकार्यांनी दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नाही आणि त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. त्यांना तूर्तास कारकुनी कामासाठी नेमण्यात आले आहे. प्राथमिक अन्वेषणात गोदामात साठवून ठेवलेल्या तांदुळाची बर्याच कालावधीसाठी योग्य प्रकारे निगा राखली गेली नसल्याचे उघडकीस आले आहे. खात्याने धान्याची साठवणूक चांगल्या प्रकारे होण्यासाठी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.