ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांचे निधन !
मुंबई – महाराष्ट्र भूषण, पद्मश्री, फिल्मफेअर आदी पुरस्कारांनी सन्मानित ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना (वय ९४ वर्षे) यांचे ४ जून या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले. वृद्धापकाळ आणि प्रकृती अस्वास्थ्य यांमुळे दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते. उपचारांच्या कालावधीत त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जिवंत अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांची ‘वात्सल्यमूर्ती आई’ अशी प्रतिमा निर्माण झाली होती. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. ५ जून या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत प्रभादेवी येथील त्यांच्या निवासस्थानी सुलोचनादीदी यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.
त्यांच्या भूमिकांमधून त्यांचा चित्रपटविषयक वारसा कायम राहील. त्यांच्या कुटुंबियांप्रति शोकसंवेदना. ओम शांती.
— Narendra Modi (@narendramodi) June 4, 2023
सुलोचना लाटकर यांचा जन्म कोल्हापूर येथील खडकलाट गाव येथे ३० जुलै १९२९ या दिवशी झाला. मराठी आणि हिंदी अशा ४०० हून अधिक चित्रपटात त्यांनी काम केले. त्यांच्या वागण्यातील नम्रता, बोलण्यातील मृदूता ही अभिनयाप्रमाणे प्रत्यक्ष जीवनातही पहायला मिळाली. ‘सुलोचनादीदी त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीने ‘आई’ गमावली’, अशी प्रतिक्रिया अनेक कलाकारांनी व्यक्त केली.