म्हैसुरू मुक्त विद्यापिठातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने होणारा कार्यक्रम रोखण्याचा विद्यापिठाचा अयशस्वी प्रयत्न !
म्हैसुरू (कर्नाटक) – येथील म्हैसुरू मुक्त विद्यापिठाच्या सभागृहात ‘सावरकर प्रतिष्ठान’च्या वतीने ‘वीर सावरकर पुरस्कार’ सोहळ्यानिमित्त मुलांसाठी चित्रकला, रक्तदान शिबिर आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते; मात्र मुक्त विद्यापिठाच्या कुलगुरूंनी कोणतेही कारण न देता कार्यक्रमाची अनुमती रहित केली आणि सभागृहाच्या प्रवेशद्वाराला कुलुप लावले. त्यामुळे मुलांनी प्रवेशद्वारासमोर चित्रे काढण्यास प्रारंभ केला. यानंतर सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. परिस्थिती चिघळण्याच्या शक्यतेनंतर विद्यापिठाच्या अधिकार्यांनी प्रवेशद्वार उघडून सभागृहात कार्यक्रम होऊ दिला.
या वेळी उपस्थित राहिलेले भाजपचे खासदार प्रताप सिन्हा म्हणाले की, काँग्रेस सरकारने सावरकरांचा कार्यक्रम रोखण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस नेहमीच सावरकरांना विरोध करते. काँग्रेस सरकार पोलिसी बळाचा वापर करून आम्हाला दडपण्याचे काम करत आहे; पण आम्ही काँग्रेसच्या धमक्यांना भीक घालणार नाही.
संपादकीय भूमिकाकर्नाटकातील काँग्रेसच्या राज्यात टिपू सुलतान उदो उदो होणार, तर सावरकरांना वाळीत टाकण्याचाच प्रयत्न होणार, यात शंका नाही ! यावरून तरी काँग्रेसला निवडून चूक केल्याचे राज्यातील हिंदूंच्या लक्षात आल्यास तो सुदिन ठरेल ! |