‘हिंदूंमध्ये उंची वाढवणारा एकही देव नाही !’, असे विधान करणार्या अमेरिकेतील प्रसिद्ध विनोदी कलाकार सौ. जरना गर्ग यांच्या हिंदुद्रोही विचारांचे खंडण !
‘२३ मे २०२३ च्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पहिल्या पानावर एक वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्तामध्ये ‘हिंदूंमध्ये उंची वाढवणारा एकही देव नाही !’, असे हिंदूद्रोही विधान भारतीय वंशाच्या अमेरिकेतील प्रसिद्ध विनोदी कलाकार सौ. जरना गर्ग यांनी केले. ईश्वरीकृपेने या हिंदुद्रोही आणि संतापजनक विधानाचे खंडण करण्यासाठी स्फुरलेले दैवी विचार येथे लेखबद्ध केले आहेत.
हिंदूंमध्ये ३३ कोटी देवता आहेत. या ३३ कोटी देवतांमधील अपरिमित दैवी सामर्थ्याने त्या अनेक जिवांचा उद्धार करतात. त्यासाठी भक्तांनी केवळ देवतांची मनोभावे भक्ती करण्याची आवश्यकता असते. याचे काही संदर्भ पुढीलप्रमाणे आहेत.
१. शिवाच्या कृपेने विंध्याचल पर्वताची प्रथम उंची वाढणे आणि नंतर ती न्यून होणे
एकदा विंध्याचल पर्वताला वाटते की, मी मेरूपर्वतापेक्षा उंच झालो पाहिजे. उंच होण्याच्या या चढाओढीत विंध्याचल पर्वत शिवाची आराधना करू लागतो. काही काळाने शिव त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला मनोवांच्छित वर देतो. त्यामुळे विंध्याचल पर्वत इतका उंच होतो की, या पर्वतावरून लोकांना आवागमन (ये-जा) करणे कठीण होऊ लागते आणि दक्षिण भारत अन् उत्तर भारताचा संपर्क तुटतो. या संकटातून बाहेर पडण्यासाठीे शिवाच्या आज्ञेने अगस्ती ऋषि विंध्याचल पर्वत पार करण्यासाठी त्याला वाकण्यास सांगतात. त्याप्रमाणे विंध्याचल पर्वत ऋषि अगस्ती यांचा मान राखण्यासाठी खाली वाकतो. त्यामुळे त्याची महाकाय उंची न्यून होते आणि अगस्ती ऋषि यांना विंध्यचल पर्वत पार करून जाता येते. त्यानंतर देवर्षि नारद विंध्याचलला म्हणतात, ‘‘अरे, अगस्ती ऋषि यांनी तुला तुझी उंची न्यून करण्यास, म्हणजे तुझ्यातील अहंकार न्यून करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता तू पुन्हा शिवाची आराधना कर आणि त्याच्याकडे तुझी उंची पूर्ववत् होण्याचा आशीर्वाद माग.’’ देवर्षि नारदांनी केलेल्या प्रबोधनानुसार प्रभावित झालेला विंध्याचल पर्वत पुन्हा शिवाची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतो. त्यामुळे त्याच्यावर शिव प्रसन्न होऊन त्याची वाढलेली उंची न्यून करून त्याला पूर्वीचीच उंची प्रदान करतात. यावरून ‘शिवामध्ये उंची वाढवण्याचे आणि ती न्यून करण्याचे सामर्थ्य आहे’, हे सिद्ध झालेे.
२. भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेने बलरामाने ज्योतिष्मतीची उंची न्यून करून नंतर तिच्याशी विवाह करणे
सत्ययुगात राजा कुकुद्मीला यज्ञकुंडातून ‘ज्योतिष्मती’ ही दिव्य कन्या प्राप्त होते. ती विवाह योग्य झाल्यावर तिच्यासाठी संपूर्ण पृथ्वीवर शोधूनही योग्य वर मिळत नाही. त्यामुळे ते ज्योतिष्मतीला घेऊन ब्रह्मलोकात जातात. तेथे ब्रह्मदेव ध्यानस्थ असल्यामुळे त्यांना काही क्षण वाट पहावी लागते. जेव्हा ब्रह्मदेव ध्यानातून बाहेर येतात, तेव्हा राजा कुकुद्मी त्याची समस्या सांगतो. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात की, ब्रह्मलोकाची कालगणना आणि पृथ्वीवरील (म्हणजे भूलोकाची) कालगणना भिन्न असल्यामुळे राजाने ब्रह्मलोकात काही क्षण व्यतीत केल्यामुळे पृथ्वीवर सत्ययुग आणि त्रेतायुग संपून आता द्वापरयुग चालू आहे. त्यामुळे राजा कुकुद्मीने त्वरित ज्योतिष्मती कन्येसह पृथ्वीवर जाऊन श्रीकृष्णाचा मोठा भाऊ ‘संकर्षण’ किंवा ‘शेषनाग’ यांचा अवतार असलेल्या बलरामाशी तिचा विवाह करून द्यावा. ब्रह्मदेवाच्या आज्ञेने राजा कुकुद्मी राजकुमारी ज्योतिष्मती या कन्येसह पृथ्वीवर द्वारका नगरीत पोचतात. तेथे त्यांची भेट श्रीकृष्ण आणि बलराम यांच्याशी होते.
सत्ययुगात मनुष्य, झाडे, पशू-पक्षी इत्यादींची काया मोठी असून त्यांची उंची पुष्कळ होती. युग परिवर्तनासह त्यांची काया आणि उंची लहान होत गेली. त्यामुळे सत्ययुगातील राजा कुकुद्मी आणि ज्योतिष्मती यांची काया आणि उंची ही द्वापरयुगातील श्रीकृष्ण अन् बलराम यांच्या उंचीपेक्षा कैकपटींनी अधिक होती. त्यामुळे राजा कुकुद्मीला ‘हा विवाह कसा होणार ?’, याची विवंचना लागून राहिली. अंतर्यामी श्रीकृष्णाने राजाची विवंचना ओळखून बलरामाला दैवी शक्तीचा प्रयोग करून ज्योतिष्मतीची उंची न्यून करण्यास सांगितले. त्याप्रमाणे बलरामाने दिव्य नांगराच्या शक्तीचा प्रयोग करून ज्योतिष्मतीची उंची न्यून केली आणि तिच्याशी विवाह केला. त्यानंतर ज्योतिष्मतीचे नामकरण ‘रेवती’ असे करण्यात आले.
३. अनेक देवता आणि संत यांनी ग्रस्त असलेल्या अनेक भक्तांवर असीम कृपा करून त्यांचा उद्धार करणे
अशा प्रकारे हिंदु देवतांनी केवळ भक्तांची उंची वाढवणे किंवा न्यून करणे यांच्यापुरतेच कार्य मर्यादित न ठेवता अनेक दैवी कार्ये केलेली आहेत. केवळ १२ वर्षांचे अल्पायुष्य असणार्या बाल मार्कण्डेयाच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या शिवाने त्याला ७ कल्पांंतापर्यंत (४ युगांचे मिळून १ कल्प असतो, असे ७ कल्प) जिवंत रहाण्याचा आशीर्वाद दिला. तसेच भगवान श्रीकृष्णाने कुबड असलेल्या आणि कुरूप दिसणार्या कुब्जेचा उद्धार करून तिचे कुबड दूर करून तिला सुंदर युवती बनवले. शिवाने यक्ष कुबेराला धन देऊन धनाचा संचय करणारा ‘यक्षराज’ बनवले, तर भगवान श्रीकृष्णाने निर्धन सुदाम्याला पुष्कळ धन आणि वैभव देऊन सुदामानगरी वसवली. शिवाने क्षयरोगग्रस्त चंद्र आणि कुष्ठरोगग्रस्त अन् कलंकित झालेला इंद्र यांचा उद्धार केला. कलियुगात संत नामदेवांनी केलेल्या प्रार्थनेवरून श्री विठ्ठलाच्या कृपेने संत गोराकुंभार यांचे दोन्ही तुटलेले हात पुन्हा आले आणि श्रीनृसिंह सरस्वतींच्या कृपेने एका ब्राह्मण बालकाची तुटलेली जीभ पुन्हा येऊन तो मूढमती बालक वेदशास्त्रसंपन्न महापंडित झाला.
४. देवतांमध्ये अष्टमहासिद्धी असल्याने त्यांना सिद्धींच्या बळावर स्वत:ची काया लहान किंवा मोठी करता येणे
हिंदूंच्या अनेक देवतांमध्ये अष्टमहासिद्धी, म्हणजे दिव्य आणि गूढ शक्ती आहेत. त्याद्वारे ते त्यांची काया लहान किंवा मोठी करून, लघु किंवा विराट रूप धारण करून दैवी कार्य करू शकतात. अष्टमहासिद्धींची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे.
४ अ. मत्स्यावताराने लघुरूप त्यागून विराट रूप धारण करणे : ‘अणिमा’ आणि ‘महिमा’ या सिद्धींमुळे स्वयंभू मनूच्या कमंडलूतील लहानशा माशाचा आकार उत्तरोत्तर वाढत गेल्यामुळे त्याला अनुक्रमे डबके, तळे, नदी आणि शेवटी समुद्रात सोडावे लागले. समुद्रात गेल्याने लहानशा माशाच्या रूपात अवतरलेला श्रीविष्णूचा प्रथम अवतार ‘मत्स्यावतार’ प्रगटला.
४ आ. वामनाने बुटक्याशा बटूचे रूप त्यागून विश्वव्यापी विराट रूप धारण करणे : त्याचप्रमाणे बुटक्याशा बटूच्या रूपातील श्रीविष्णूने जेव्हा बळीराजाकडून ३ पावले भूमी मागितली, तेव्हा त्याने विशालकाय रूप धारण करून त्रिलोक व्यापून ‘वामनावतार’ प्रगट केला.
४ इ. हनुमानाने आवश्यकतेनुसार विराट आणि लघु रूप धारण करणे : अशाच प्रकारे सीतामातेच्या शोधासाठी जेव्हा वानर भारताच्या दक्षिण तटावर आले, तेव्हा हनुमानाने विशालकाय रूप धारण करून १०० योजने (४०० कि. मी.) समुद्र पार करून लंकेत प्रवेश केला आणि तो अशोक वाटिकेत बसलेल्या सीतामातेसमोर लघुरूपात प्रगट झाला होता.
५. भारतीय संस्कृती ‘मूर्ती लहान; पण कीर्ती महान !’, या तत्त्वावर विश्वास ठेवणारी असणे
भारतीय संस्कृती ‘मूर्ती लहान, पण कीर्ती महान !’, या तत्त्वावर विश्वास ठेवणारी आहे.
५ अ. दमदाटी करणार्या मौलाना शौकत अलींना ‘अफझलखानवधा’चे स्मरण करून देऊन निरुत्तर करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर !
जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर मुसलमानांकडून हिंदूंच्या होणार्या धर्मांतराला विरोध करत होते, तेव्हा मौलाना शौकत अली स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर पुष्कळ चिडून म्हणाले, ‘‘तुम्ही माझ्यापेक्षा बुटके आहात. मी तुम्हाला चिरडून टाकीन.’’ तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले, ‘‘मी तुमचे आव्हान स्वीकारतो; पण छत्रपती शिवाजी महाराजही अफझलखानासमोर अतिशय बुटके होते, तरीही या लहान उंचीच्या मराठा राजाने महाकाय आणि धिप्पाड दिसणार्या पठाणाचे पोट फाडले होते. हे तुम्हाला ज्ञात नाही का ?’’ अशा प्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मौलानाला निरुत्तर केले. (साभार : २४ मे २०२३ चे दैनिक ‘सनातन प्रभात’मधील पृष्ठ ५ वरील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्ट्रवाद आणि संस्कृती यांविषयीचे विचार’ या लेखातून)
५ आ. मूळ ‘अर्जेंटिना’ या राष्ट्राचा गरीब नागरिक आणि बुटका फुटबॉलपटू असलेल्या ‘लियोनेल मेस्सी’ याने जगप्रसिद्ध ‘सॉकर विजेता’ होऊन कोट्यधीश होणे : ‘अर्जेंटिना’ या राष्ट्रातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या आणि सध्या ‘बार्सिलोना एफ्. सी.’ या फुटबॉल संघातील अग्रगण्य फुटबॉलपटू ‘लियोनेल मेस्सी’ यांच्या बालपणात त्यांच्यात ‘ग्रोथ हार्मोनचा अभाव’ (growth hormone defeciency), म्हणजे ‘शरीराची वाढ करणारे संप्रेरक’ याची कमतरता होती. त्यामुळे लियोनेल मेस्सी यांची लहानपणी वाढ खुंटली होती. त्यासाठी त्यांना वयाच्या ११ व्या वर्षापासून प्रतिदिन पायांच्या स्नायूंमध्ये इंजेक्शन घ्यावे लागत होते. त्याची उंची सामान्य मुलांपेक्षा न्यून असल्यामुळे, म्हणजे तो बुटका असल्यामुळे त्याला खेळात नेहमीच डावलेले जायचे. असे असूनही त्याने धीर न खचू देता कौशल्याने फुटबॉल खेळणे चालूच ठेवले. अखेर त्यांच्या कौशल्याची नोंद ‘बार्सिलोना’ या संघाच्या आयोजकांनी घेतल्यामुळे त्यांची निवड ‘बार्सिलोना एफ्.सी.’ या सुप्रसिद्ध फुटबॉल संघात झाली. या संघाच्या अंतर्गत त्यांनी ‘सॉकर’ या जागतिक फुटबॉल स्पर्धेत भाग घेऊन सलग ५ वेळा ‘उत्कृष्ट खेळाडू’ म्हणून पारितोषिक मिळवले. आता लियोनेल मेस्सी हा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू होण्यासह तो ‘युनिसेफ’ या जागतिक संघटनेचे प्रतिनिधीत्व करत आहे. तसेच तो अनाथ मुलांसाठी एक संघटना चालवून त्या मुलांना खेळाचे प्रशिक्षणही देत आहे.
तात्पर्य
अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी असो, यांनी कधीच त्यांच्या बुटकेपणासाठी दैवाला (म्हणजे प्रारब्धाला किंवा नशीबाला) कारणीभूत ठरवून देवावर दोषारोपण केले नाही, त्यांनी स्वत:चा आत्मविश्वास कधीच गमावला नाही; कारण पराक्रम करण्यासाठी उंचीची (बाह्य गोष्टींची) आवश्यकता नसून पुरुषार्थ करण्याची आणि कर्तृत्वाची आवश्यकता असते. देहाची उंची वाढवण्यापेक्षा मनाची उंची, म्हणजे वैचारिक स्तर आणि आध्यात्मिक उंची, म्हणजे आध्यात्मिक पातळी वाढली की, जीवनाचा उत्कर्ष होतो. वरील सर्व उदाहरणे आणि तात्पर्य यांतून हेच सिद्ध होते की, सौ. जरना गर्ग हिने हिंदुद्रोहाने केलेले वरील विधान हिंदु धर्मशास्त्राविषयी अज्ञानच दर्शवते. तिने दैवाला दोष न देता हिंदु धर्मशास्त्राचा सखोल अभ्यास करून भगवंताची मनोभावे भक्ती केली, तर देव केवळ त्यांची शारीरिक उंचीच नव्हे, तर मानसिक आणि आध्यात्मिक उंचीही नक्कीच वाढवू शकतो, हे लक्षात घ्यावे. ’
– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.५.२०२३)