प्रखर राष्ट्रप्रेमी आणि निर्भय असलेले प.पू. गोळवलकरगुरुजी !
आज प.पू. गोळवलकरगुरुजी यांचे दिनांकानुसार पुण्यस्मरण आहे. त्या निमित्ताने…
१. सरसंघचालकपदी नियुक्ती
वर्ष १९३८ मध्ये नागपूरच्या संघशिक्षा वर्गात प.पू. गोळवलकरगुरुजींनी ‘सर्वाधिकारी’ म्हणून उत्तम सेवा केली. शारीरिक कार्यक्रम, भोजन व्यवस्था, रुग्णालय, स्वच्छता आदी सर्व गोष्टींकडे त्यांचे बारीक लक्ष असे. रात्री भोजन मंडपात जाऊन तेथील अग्नी नीट विझवला आहे कि नाही ? हेसुद्धा ते पहात असत.
वर्ष १९३९ मध्ये त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय ‘सरकार्यवाह’ म्हणून घोषित करण्यात आले. या वेळी डॉ. हेडगेवार यांनी संघातील काही प्रमुख मंडळींची १० दिवसांची एक बैठक घेतली. या बैठकीत संघाची घटना, आज्ञा, प्रार्थना, प्रतिज्ञा इत्यादींसंबंधी अनेक मूलभूत निर्णय घेण्यात आले. आज प्रचलित असलेल्या संघाच्या संस्कृत प्रार्थनेचा मूळ मराठी आलेख याच बैठकीत गुरुजींनी लिहिला. त्यानंतर डॉक्टरांनी गुरुजींना संघाची शाखा चालू करण्यासाठी कोलकाता येथे पाठवले. गुरुजी आता डॉक्टरांसमवेत प्रवास करू लागले. बहुधा डॉक्टर त्यांनाच बोलायला सांगत आणि ते काय बोलतात ? कसे बोलतात ? हे लक्षपूर्वक ऐकत. पुढे डॉक्टरांच्या योजनेनुसार सरकार्यवाह या नात्याने गुरुजींनी देशातील अनेक प्रमुख नगरांना भेटी दिल्या. वर्ष १९४० मध्ये पुन्हा त्यांना नागपूरच्या संघशिक्षा वर्गाचे ‘सर्वाधिकारी’ नेमण्यात आले. या वर्गाच्या समारोपाला डॉ. हेडगेवार यांनी केलेले भाषण शेवटचे ठरले. आपला उत्तराधिकारी म्हणून डॉक्टरांनी प.पू. गोळवलकरगुरुजींचे नाव याच काळात सर्वांना सांगितले. २१ जून १९४० या दिवशी डॉ. हेडगेवार यांच्या निधनानंतर प.पू. गोळवलकरगुरुजी ‘सरसंघचालक’ झाले.
२. निर्भयता
सरसंघचालक झाल्यापासून गुरुजींचा प्रवास चालू झाला, तो सतत ३३ वर्षे चालू राहिला. पायी, बैलगाडीने, टांग्याने, सायकलीने, मोटारीने, आगगाडीने, विमानाने अशा सर्व प्रकारच्या वाहनांनी त्यांनी लाखो मैल प्रवास केला. प्रत्येक प्रांताला ते वर्षातून दोनदा तरी भेट देत असत.
दुसरे महायुद्ध चालू झाले, त्या वेळी बंगालमध्ये गुरुजींचा प्रवास ठरला होता. जपानी आक्रमणामुळे बंगालमधील लोक भयभीत झाले होते. कार्यकर्त्यांनी गुरुजींना प्रवास रहित करण्यासंबंधी कळवले. गुरुजींनी त्वरित संबंधितांना तारा केल्या आणि ‘प्रवास ठरल्याप्रमाणेच होईल’, असे कळवले. हा सर्व प्रवास व्यवस्थित पार पडला. गुरुजी कार्यकर्त्यांसमोर म्हणाले, ‘‘जेव्हा इतर लोक घाबरले असतील, तेव्हा आपण दृढतेने पाय रोवून उभे राहिले पाहिजे. संघाला सर्वत्र निर्भयता निर्माण करायची आहे. आपणच जर भ्यायलो, तर लोकांनी कुणाकडे पहावे बरे ?’’
३. संघावरील पहिली बंदी आणि प.पू. गोळवलकरगुरुजींना अटक
वर्ष ३० जानेवारी १९४८ या दिवशी म. गांधी यांची हत्या झाली. या हत्येशी संघ किंवा प.पू. गोळवलकरगुरुजी यांचा काहीही संबंध नव्हता; पण तत्कालीन पंतप्रधान आणि काँग्रेसी नेते यांनी संघावर वाटेल तसे आरोप करायला प्रारंभ केला. ईर्ष्या, मत्सर आणि द्वेष यांचे थैमान चालू झाले. गांधींचे नाव घेत शासनकर्ते खोट्या गोष्टी बोलू लागले. आकाशवाणी, वर्तमानपत्रे यांच्या माध्यमातून गरळओक होऊ लागली. गावोगावी स्वयंसेवकांना मारहाण झाली. काहींना जिवंत जाळण्यात आले, तर काहींची घरे पेटवण्यात आली. पोलिसांनी गुरुजींना पकडले. ४ फेब्रुवारी १९४८ या दिवशी सरकारने संघकार्य बेकायदा असल्याचे घोषित केले.
संपूर्ण देशात नाना प्रकारचे आरोप ठेवून सहस्रो स्वयंसेवकांना पकडण्यात आले. गुरुजींवर ‘गांधीजींच्या हत्येचा कट करणे, मारामारी करणे, सरकार उलथून टाकण्याचा प्रयत्न करणे’, असे आरोप ठेवण्यात आले. थोड्याच दिवसांत सरकारला आपला मूर्खपणा कळून आल्यावर सर्व आरोप काढून गुरुजींना केवळ स्थानबद्ध ठेवण्यात आले. त्यांनी कारागृहात संघकार्याच्या चिंतनासह आसने, ध्यानधारणा, जपजाप्य इत्यादी गोष्टी अधिक प्रमाणात चालू केल्या. ६ ऑगस्ट १९४८ या दिवशी सरकारने त्यांना मुक्त केले आणि परत १२ नोव्हेंबर १९४८ या दिवशी अटक केली.
संघाने देशव्यापी सत्याग्रहाचा आदेश दिला. लहान-मोठ्या नगरांत संघाच्या स्वयंसेवकांनी सत्याग्रहाची घोषणा केली. शेवटी संघावरील बंदी उठवण्यात आली.
४. अन्य सेवाकार्ये
प.पू. गोळवलकरगुरुजींच्या आदेशानुसार डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी राजकीय क्षेत्रात काम करू लागले. ‘भारतीय जनसंघ’ या नावाने राजकीय पक्ष स्थापन करण्यात आला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदु परिषद, वनवासी कल्याण, महारोगी सेवा, राष्ट्रीय शिशू शिक्षण आदी अनेक संस्था गुरुजींच्या प्रेरणेने सेवा करू लागल्या. डॉ. हेडगेवार यांच्या समाधीस्थानी स्मृतीमंदिराची उभारणी, कन्याकुमारीचे विवेकानंद शिलास्मारक, तसेच शेकडो शिक्षण संस्था गुरुजींच्या प्रेरणेने उभ्या राहिल्या.
५. महानिर्वाण
वर्ष १९६९ पासून प.पू. गोळवलकरगुरुजींच्या प्रकृतीची अस्वस्थता वाढू लागली, तरी त्यांचा प्रवास अव्याहत चालूच होता. ते विनोदाने ‘आगगाडीचा डबा हेच माझे घर आहे’, असे म्हणत. १८ मे १९७० या दिवशी त्यांच्या अस्वस्थतेचे कारण निश्चित झाले कर्करोग !
ज्येष्ठ शुद्ध पंचमी, ५ जून १९७३ या दिवशी पार्थिव देहाचा त्याग करून प.पू. गोळवलकरगुरुजी सच्चिदानंद स्वरूपात विलीन झाले. अशा प.पू. गुरुजींच्या चरणी आमचे कोटी कोटी प्रणाम !’
– श्री. संजय मुळ्ये, रत्नागिरी (३.२.२०१०)