राज्य सरकार लव्ह जिहाद प्रकरणावर सजग आहे ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
पुणे येथे माध्यमांशी बोलतांना उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया !
पुणे – दुसर्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करण्यावर कोणताही आक्षेप असू नये; मात्र सध्या महिलांची दिशाभूल करून, खोटी आश्वासने देऊन लग्न केली जात आहेत. ज्या लोकांचे आधीच लग्न झाले आहे, ते वेगळी ओळख सांगून महिलांना फसवत आहेत. त्यावरून लव्ह जिहादच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत, असे दिसत आहे. राज्य सरकार लव्ह जिहादच्या प्रकरणांविषयी सजग आहे. आम्ही यावर कायदा बनवण्याचा विचार करत आहोत. आम्ही सध्या वेगवेगळ्या राज्यांतील कायद्यांचा अभ्यास करत आहोत, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजप नेत्यांकडून वारंवार लव्ह जिहादचे सूत्र उपस्थित केले जात आहे. तसेच लव्ह जिहादच्या विरोधातील कायद्याची मागणीही केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील बेपत्ता महिलांची वाढती संख्या आणि लव्ह जिहादविषयी विचारणा केली असता देवेंद्र फडणवीस यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते ३ जून या दिवशी पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, बेपत्ता महिलांच्या तक्रारींवर आम्ही पुष्कळ संवेदनशील आहोत. आकडे पाहिले, तर बेपत्ता महिलांच्या प्रकरणात या महिलांचा शोध घेण्याचे प्रमाण ९० टक्के आहे. काही ठिकाणी तर हे प्रमाण ९५ टक्के आहे. असे असले तरी यात पुष्कळ अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे.