आज असलेल्या ‘जागतिक पर्यावरण दिना’च्या निमित्ताने …
|
जागतिक पर्यावरणदिनाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण येथील निसर्ग अन् सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या कोकणातील राज्य पदाधिकार्यांनी नुकतीच ‘अरण्यऋषी’ मारुति चितमपल्ली यांची सोलापूर येथे भेट घेतली. या वेळी श्री. मारुति चितमपल्ली यांनी कोकणी निसर्ग आणि पर्यावरण यांच्या आठवणी जागवल्या. पर्यटन-पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते लेखक धीरज वाटेकर आणि निसर्ग अन् सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष, तसेच चिपळूण तालुक्यात पहिले कृषी पर्यटन केंद्र उभारणारे विलास महाडिक यांनी चितमपल्ली यांच्याशी जागतिक पर्यावरणदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘कोकण निसर्ग आणि पर्यावरणा’विषयी नुकताच संवाद साधला. या वेळी चितमपल्ली यांना कोकणात मे मासात फुलणार्या कंदवर्गीय फुटबॉल लिली (मे प्लॉवर) चे फूल आणि रोप, पर्यावरण मंडळाचा शिर्डी पर्यावरण संमेलन ‘वनश्री’ विशेषांक आणि पर्यटन कोकणाचा संशोधित नकाशा भेट देण्यात आला.
गुरु भातखंडे यांच्यासमवेत कोकण फिरण्याची मिळालेली संधी !
या संवादाच्या वेळी श्री. मारुति चितमपल्ली म्हणाले की, कोकणाविषयी, तेथील जीवनमानाविषयी, निसर्गाविषयी पहिल्यापासून आजही माझ्या मनात गूढरम्य आकर्षण आहे. वाचनामुळे या आकर्षणाचा विकास झाला. सानेगुरुजी, र.वा. दिघे, गो. नी. दांडेकर आदी कोकणाशी संबंधित लेखकांचे लेखन वाचलेले होते. त्यातून प्रवासी म्हणून कोकणात फिरावे, असे नेहमी वाटायचे. गुरु भातखंडे यांच्यामुळे जीवनात प्रारंभी त्यांच्यासमवेत कोकण फिरण्याची संधी मिळाली. ‘एनी डॅनिकेन’ यांनी देवाच्या अस्तित्वाविषयी ६ खंड लिहिलेले आहेत, त्यात कोकणाचा उल्लेख आहे.
डॉ. सलीम अली यांच्याकडून ‘पक्षी’ हा विषय शिकलो !
४ चौरस कि.मी.चे क्षेत्रफळ असलेले कर्नाळा पक्षी अभयारण्य डॉ. सलीम अली यांच्या पाठपुराव्यातून स्थापन झाले. २० वर्षे डॉ. सलीम अली यांच्या संपर्कात रहायची संधी मिळाली. अलिबागजवळ किहीम गावात त्यांचा बंगला होता. मुंबईहून जाता येता ते कर्नाळ्याला थांबायचे. त्यांनी निसर्ग जगायला शिकवला. ‘कर्नाळ्यात निसर्ग आणि पर्यावरण, पक्षी यांची योग्य जाणीव असलेल्या वन अधिकार्याची नेमणूक व्हावी’, अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेला माझ्या नेमणुकीची जोड मिळाली असावी. कर्नाळा हे अभयारण्य नसतांना वन अधिकारी म्हणून ५ वर्षे तेथे मी काम केले. कर्नाळ्यात काही दुर्मीळ पक्ष्यांचे वास्तव्य होते. डॉ. सलीम यांच्याकडून पक्षी हा विषय शिकायला मिळाला. अनेक नामवंतांच्याही ओळखी झाल्या.
पशूपक्ष्यांच्या हालचालींवरून पाऊस, तसेच दुष्काळ यांचे मिळणारे संकेत
‘द ओल्ड मॅन अँड द सी’ ही अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी वर्ष १९५१ मध्ये कायो ब्लॅन्को येथे लिहिलेली कादंबरी वाचल्यापासून जीवनात मत्स्यकोश लिहावा, अशी मनात जिज्ञासा होती. याच जिज्ञासेपोटी जीवनात २ वर्षे हर्णेला स्थायिक झालो. कोकणच्या समुद्रकिनार्यावरील वास्तव्यात समुद्री पक्षी, तसेच समुद्री जीवांच्या हालचालींचा अभ्यास केला. त्यातून पावसाळ्यापूर्वीचे सृष्टीतील असंख्य आश्चर्यजनक पालट टिपले. पावसाळ्यापूर्वी जंगलातील वातावरणातले अनोखे पालट सूक्ष्म निरीक्षणानंतर जाणवले. पशूपक्ष्यांची अस्वस्थता, त्यांच्या हालचालींवरून येणार्या पावसाच्या अंदाजाचे, तसेच दुष्काळाचे मिळणारे संकेत, हे अत्यंत गूढ रहस्य आहे. निबिड अरण्यातील आणि समुद्रकाठानजीकचे माझे अनुभव फार वेगळे आहेत. हवामान विभागानेही या निरीक्षणांची नोंद घ्यावी, एवढे ते महत्त्वाचे आहेत. अगदी बारीकसारीक घटनांवर नजर ठेवली, तर काही पूर्वसंकेतांची चाहूल मिळते. पाऊस येण्याअगोदर वादळी पक्षी किनार्याच्या दिशेने येऊ लागतात. त्यामुळे पाऊस पडणार याचे संकेत ओळखून समुद्रावर उपजीविका करणारे मासेमार त्यांच्या बोटी समुद्रात नेत नाहीत.
समुद्रातील माशांमध्ये एकदम खळबळ माजते. त्यांच्या हालचाली अत्यंत गतिमान होऊन ते समुद्रात उंच उड्या मारू लागतात. हे चित्र नवीन पिढीने समुद्रकिनार्याशेजारी मुक्काम ठोकून अवश्य निरखावे. समुद्रातील प्राण्यांनी अस्वस्थ हालचाली चालू केल्यानंतर समुद्रातून प्रचंड असे आवाज येऊ लागतात. ‘वादळी पाखरू किनार्याच्या दिशेने आले की, वादळवारा त्याच्यापाठोपाठ येत आहे’, याचे संकेत कोळ्यांना मिळतात. एक प्रकारे ती धोक्याची पूर्वसूचनाच असते.
पहिल्या पावसानंतर नदी-नाले, ओढे यांचे पाणी समुद्राला येऊन मिळू लागते, तसे मासे त्या पाण्यात उड्या मारून प्रवेश करतात आणि प्रवाहाच्या उलट दिशेने जाऊ लागतात. डोंगर, पहाडी भागांतून वहाणार्या नद्यांच्या पाण्यात ते अंडी घालतात आणि पुन्हा सरळ दिशेने समुद्रात परततात. हे नैसर्गिक जीवनचक्र आहे. याविषयी अत्यंत बारकाईने निरीक्षण केले असता पहाडी, डोंगरी भागांतील माशांच्या अंड्यांतील पिल्ले मोठी होऊन जेव्हा समुद्राच्या दिशेने पोहू लागतात, तेव्हा तो काळ पाऊस संपण्याचा उत्तरा नक्षत्राचा असतो. त्यामुळे पाऊस केव्हा पडणार आणि केव्हा संपणार ? याची सुस्पष्ट चाहूल माशांच्या या जीवनचक्रातून मिळते.
पावसाळ्याच्या प्रारंभी तांबूस रंगाचे खेकडे सहस्रोंच्या संख्येने समुद्राच्या दिशेने जातांना दिसतात. त्यांच्या मार्गाचे निरीक्षण केले असता पावसाचे संकेत मिळतात. हा खेकड्यांच्या स्थलांतरणाचा कालखंड आहे. त्यांची समुद्री धाव कशासाठी असते ? याचा विचार करायला हवा. आज पाऊस केव्हा आणि किती पडणार ? हे सांगणारी पशूपक्ष्यांच्या प्रजाती आज धोक्यात आल्या आहेत. कोकणातील खेकड्यांचे प्रकार, केळशीतील वाळूतले होरं, मुरूडचे डॉल्फिन त्यांच्या सवयी, याविषयी किती बोलू तेवढे थोडे आहे.
संशोधनासाठी रानवाटा तुडवण्याची सिद्धता हवी !
भारतात सोळा प्रकारची जंगले आहेत. कोकणातील तिवरांची जंगले ही खासगी संपत्ती होता कामा नये. राज्य सरकारने ती स्वत:च्या कह्यात घेतली पाहिजेत, अशी भूमिका पूर्वी मी मांडली आहे. आजच्या तरुणांना पर्यटनासाठी जंगल आवडत असले, तरी संशोधनासाठी रानवाटा तुडवण्याची त्यांची सिद्धता नाही. जंगलात फिरतांना नोंदी घ्यायला हव्यात. प्रयोगशाळा आणि ग्रंथालये यांमध्ये बसून वन्यप्राणी अन् वनस्पती यांचे संशोधन होणार नाही. समग्र लिखाणासाठी अनुभवाची शिदोरी लागत असते.