अश्वमेध यज्ञ हा व्यक्तीसह राष्ट्र निर्माणासाठी ! – रमेश बैस, राज्यपाल
नवी मुंबई, ४ जून (वार्ता.) – भगवान श्रीराम यांनी अश्वमेघ यज्ञ धर्माच्या रक्षणासाठी केला होता, तर गायत्री परिवाराच्या वतीने करण्यात येणारा अश्वमेध यज्ञ हा व्यक्ती आणि राष्ट्र यांच्या निर्माणासाठी करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी खारघर सेंट्रल पार्क मैदान येथे केले. अखिल विश्व गायत्री परिवार संस्थेच्या वतीने मुंबई अश्वमेघ महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या यज्ञाच्या स्थळाच्या भूमीपूजनाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
२३ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत खारघर येथे ‘अश्वमेघ महायज्ञ’ होणार आहे. जगातील ८० देशांतून लाखो भाविक या यज्ञासाठी येणार आहेत.
या यज्ञाच्या भूमीपूजनाच्या प्रसंगी हरिद्वारच्या देव संस्कृती विश्वविद्यालयाचे प्रतिकूलपती डॉ. चिन्मय पंड्या, सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, हिरानंदानी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी, राधिका मर्चंट आदी उपस्थित होते. अखिल विश्व गायत्री परिवाराचे प्रमुख डॉ. प्रणव पंड्या यांचा डिजिटल संदेश या प्रसंगी व्हिडिओद्वारे दाखवण्यात आला.
राज्यपाल रमेश बैस या वेळी म्हणाले की, हिंदु धर्म अतिशय पुरातन धर्म आहे. हिंदु धर्माला अनेक काळापासून काहींनी तोडण्याचा प्रयत्न केला. जातीच्या आधारे माणसांमध्ये भेद निर्माण केला. येथील मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली; मात्र गायत्री परिवाराने लोकांना जोडण्याचे काम केले आहे. हा यज्ञ केवळ धर्मापुरता सीमित नसून यातून मन शुद्ध होऊन पर्यावरण, संस्कृती यांचेही संवर्धन होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला विश्वगुरु करण्याचा संकल्प केला आहे. विश्व कल्याणासाठी हा यज्ञ आहे. भारताला बळकट बनवून हे ‘हिंदु राष्ट्र बनावे’ असे गायत्री परिवाराचे प.पू. गुरुदेवांचे स्वप्न होते. या यज्ञासाठी आमचे सहकार्य आहे, असेही बैस यांनी या वेळी सांगितले.
डिजिटल संदेशामध्ये डॉ. प्रणव पंड्या म्हणाले की, देवसंस्कृती उत्थानासाठी हा ऐतिहासिक ४९ वा यज्ञ आहे. याद्वारे भारतीय संस्कृती प्रत्येकापर्यंत पोचवण्यात येणार आहे. आसुरी वृत्ती समाजात वाढू नये यासाठी हा यज्ञ आहे. भौतिकवादामुळे पर्यावरणात पालट झाला आहे. या भौतिकवादाच्या जागी अध्यात्मवाद निर्माण व्हायला हवा. अध्यात्म हेच भारतीय संस्कृतीचे मूळ आहे. याविषयी जनतेमध्ये जागृती करण्याची आवश्यकता आहे. देश-विदेशांतील लाखो भाविक यात सहभागी होणार आहे.
सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, हा यज्ञ एकेकाळी राज्ये जिंकण्यासाठी केला जात होता; मात्र आता गायत्री परिवाराच्या वतीने करण्यात येणारा हा यज्ञ मनाला जिंकण्यासाठी करण्यात येणार आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ आपली संस्कृती आहे. या संस्कृतीत केवळ स्वतःचा नव्हे, तर सर्व विश्वाच्या कल्याणाचा विचार केला जातो. विश्वाच्या कल्याणाचा विचार अध्यात्मात आहे. अध्यात्माच्या माध्यमातून माणसांना जोडण्याची आवश्यकता आहे. व्यक्ती, समाज आणि राष्ट्र निर्माण हाच या यज्ञाचा संकल्प आहे.
देशात इतकी राज्ये असतांना यज्ञासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्य भूमीची निवड केल्याविषयी गायत्री परिवाराचे मुनगंटीवार यांनी आभार मानले.
डॉ. चिन्मय पंड्या म्हणाले की, देशाने अनेक आक्रमणे झाली; परंतु आपली मूळ संस्कृती कायम टिकून आहे. हा यज्ञा केवळ मुंबईच्या नव्हे, तर अखिल जगताच्या कल्याणासाठी होत आहे. व्यक्तीची केवळ बाह्य नव्हे, तर आंतरिक सुधारणा अपेक्षित आहे. हे यातून साध्य होणार आहे. विश्वातील १ कोटी भाविक या यज्ञात उपस्थित रहाणार आहेत.