हिंदू मुलींनी आत्मरक्षणासह धर्माधांना धडा शिकवण्यासाठी सज्ज रहावे ! – विक्रम पावसकर
सातारा, ४ जून (वार्ता.) – भारतामध्ये प्रतिवर्षी सहस्रो हिंदू मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत. यासाठी शुद्धधर्माचरण महत्त्वाचे असून हिंदू मुलींनी आत्मरक्षणासह धर्माधांना धडा शिकवण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहन हिंदु एकता आंदोलनचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर यांनी केले. जैतापूर (जिल्हा सातारा) येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि ‘वेड हिंदवी स्वराज्याचे’ या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर शिवव्याख्याते श्री. नीलेश जगताप, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
या वेळी शिवव्याख्याते श्री. नीलेश जगताप यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा देव, देश अन् धर्म यांसाठी बलीदानाचा इतिहास सांगत हिंदु युवकांनी प्रशासन, न्यायव्यवस्था यांसारखे आधुनिक गड सर करण्याचे आवाहन केले. या वेळी सौ. भक्ती डाफळे म्हणाल्या की, आतापर्यंत धर्मशिक्षणाअभावी हिंदूंची स्थिती दयनीय झाली होती. देशातील हिंदु आता जागृत होऊ लागला आहे. जागृत झालेल्या हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन हिंदु धर्माची महानता जाणून घेतली पाहिजे. समस्त हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन धर्मरक्षणासाठी सिद्ध झाले पाहिजे. श्री. गणेश बाबर यांनी हिंदु धर्म शास्त्रातील मूल्ये समजावून सांगत धर्मातील प्रत्येक कृती जाणून घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने धर्माचरण करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ऋतुजा चव्हाण यांनी, तर आभारप्रदर्शन श्री. प्रशांत जाधव यांनी केले.