पालखी सोहळ्यातील वाहतुकीच्या नियोजनासाठी आळंदीमध्ये ७ ते १२ जूनपर्यंत वाहनांना प्रवेशबंदी !
आळंदी (जिल्हा पुणे) – येथे ११ जून या दिवशी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा संपन्न होणार आहे. तसेच दुसर्या दिवशी पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. हा सोहळा ६ ते १२ जून या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे. या उत्सवासाठी राज्यासह परराज्यातून अनुमाने ४ ते ५ लाख भाविक उपस्थित रहाण्याची शक्यता आहे. या काळात आळंदी आणि परिसरामध्ये रस्त्यावर भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे ७ ते १२ जून या कालावधीत आळंदी शहरामध्ये केवळ वारकरी आणि अत्यावश्यक सुविधा देणारी वाहने यांनाना प्रवेश देण्यात येणार असून इतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी केले आहे.
गोडसे यांनी सांगितले की, आळंदीतील जे कर्मचारी कामानिमित्त आळंदीच्या बाहेर जातात. अशा सर्व कामगार आणि स्थानिक नागरिक यांना पासची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी येत्या ६ जूनपासून पास देण्यात येणार आहेत.