सातारा येथे मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेकदिन साजरा !
सहस्रो शिवभक्तांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक
सातारा, ३ जून (वार्ता.) – ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’ या जयघोषात २ जून या दिवशी ‘शिवराज्याभिषेकदिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सायंकाळी सहस्रो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली.
श्री शिवराज्याभिषेकदिन उत्सव समिती आणि सातारा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ३५० वा ‘शिवराज्याभिषेकदिन’ सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याची सांगता भव्य मिरवणुकीने झाली.
या वेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि धर्मध्वजाचे पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ झाला.
मिरवणुकीतील घोडेस्वार मावळे आणि बालशिवाजी नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. मिरवणूक पहाण्यासाठी नागरिकांनी राजपथाच्या दोन्ही बाजूला गर्दी केली होती. राजवाडा गांधी मैदान, मोती चौक, कमाणी हौद, शेटे चौक, पोलीस मुख्यालयामार्गे मिरवणूक शिवतीर्थावर पोचली. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते शिवप्रभूंच्या पूर्णाकृती मूर्तीला अभिवादन करून मिरवणुकीची सांगता झाली.