सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी पॅरिस येथे केलेल्या दैवी दौर्याचा वृत्तांत !
‘पूर्वीच्या काळी संत आणि महापुरुष पुष्कळ तीर्थयात्रा करत असत. वाटेत ज्या ठिकाणी ईश्वराचे भक्त असतील, त्यांच्या घरी वास्तव्य करून ते त्यांना आनंद देत असत. आपल्याही वाचनात असे काही संत आणि महापुरुष यांचे प्रवासवर्णन आले असेल. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या कृपाशीर्वादाने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी केलेल्या विदेश प्रवासाचे सचित्र वर्णन या लेखाद्वारे अनुभवता येईल. सप्तर्षींनी सहस्रो वर्षांपूर्वी नाडीपट्टीमध्ये लिहिल्याप्रमाणे प्रवास करणे सोपे नाही. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सप्तर्षींचे आज्ञापालन कसे केले ?’, हेही आपण या दैवी प्रवास वर्णनातून जाणून घेऊया.
प्रवासाची पार्श्वभूमी
ऑगस्ट २०२२ मध्ये सप्तर्षींनी सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या वाचनातून सांगितले होते, ‘एप्रिल २०२३ मध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी युरोप आणि ब्रिटन येथे प्रवास करायचा आहे. हा प्रवास म्हणजे धर्मसंस्थापनेतील एक ऐतिहासिक टप्पा असणार आहे. प्रवासाचा आरंभ युरोपच्या उत्तर समुद्राकडे असलेल्या द्वीपनगरीतून करावा. पाण्यात असलेल्या या नगरात आधी जावे. (हे शहर, म्हणजे नेदरलँड्स देशाची राजधानी ॲमस्टरडॅम् – संकलक). येथून पॅरिस शहरात जावे आणि तेथील देवीच्या प्राचीन मुख्य स्थानी जावे.
परमेश्वरीदेवीचे मंदिर म्हणजे ‘अवर लेडी ऑफ पॅरिस’ या चर्चकडे बघतांना श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना आलेल्या दैवी अनुभूती
६.४.२०२३ या दिवशी सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी पॅरिस शहरातील परमेश्वरीदेवीच्या स्थानाचे (नोट्रे डेम कॅथेड्रलचे) दर्शन घ्यायचे ठरवले. ज्या दिवशी आम्ही तिथे जायला निघालो, तेव्हा त्या ठिकाणी फ्रान्स सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन चालू असल्याने कॅथेड्रल बंद करण्यात आले होते. थोड्या वेळाने आम्ही सीन नदीतून पॅरिस शहराचे दर्शन घडवणार्या एका बोटीवर गेलो. ती बोट नोट्रे डेम कॅथेड्रलच्या जवळ आली, तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना पुष्कळ छान अनुभूती आल्या.
अ. दोघींच्या अंगावर शहारे आले.
आ. दोघींना देवीच्या गाभार्यात येतो, तसा कुंकवाचा छान सुगंध आला.
इ. दोघींना देवीच्या मंदिरात तेलाचे दिवे प्रज्वलित केल्यावर जसा सुगंध जाणवतो, तसा सुगंध जाणवला.
ई. दोघींना देवीच्या आरतीचा नाद ऐकू आला.
त्यामुळे दोघींचा भाव दाटून आला. त्यांच्या चेहर्यावर एक निराळाच आनंद दिसत होता.
‘आपत्काळात परमेश्वरी देवीचा महिमा लक्षात येणार आहे’, असे सप्तर्षींनी सांगणे
हे सर्व सप्तर्षींच्या चरणी निवेदन केल्यावर त्यांनी सांगितले, ‘परमेश्वरीदेवी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ पॅरिसला कधी येणार ?’, याची वाट बघत होती. पुढे आपत्काळात या देवीचा महिमा लक्षात येणार आहे.’
नावेत उभ्या असलेल्या डावीकडून श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ ! मागे श्री परमेश्वरीदेवीचे स्थान असलेले नोट्रे डेम कॅथेड्रल
फ्रान्स देशाची राजधानी पॅरिस या शहरातील ‘परमेश्वरीदेवी’च्या स्थानाचा लागलेला शोध !
१. प्रसिद्ध इतिहासतज्ञ पु.ना. ओक यांनी लिहिलेल्या शोधग्रंथात परमेश्वरीदेवीच्या प्राचीन मुख्य स्थानाचा शोध लागणे
सप्तर्षींनी सांगितले होते, ‘पॅरिसला गेल्यावर तेथील देवीच्या मुख्य स्थानी जाऊन यायचे आहे. ‘पॅरिस येथे देवीचे मुख्य स्थान कोणते ?’, हे आमच्या लक्षात येत नव्हते. याविषयी शोध घेतल्यावर प्रसिद्ध इतिहासतज्ञ पु. ना. ओक यांनी लिहिलेल्या ‘वर्ल्ड वेदिक् हेरिटेज’ या शोधग्रंथात त्याचा शोध लागला.
२. फ्रान्स देशाच्या राजधानीला ‘पॅरिस’ हे नाव आदिशक्तिचे रूप असलेल्या परमेश्वरीदेवीच्या नावापासून लाभले असणे
फ्रान्स देशाच्या राजधानीला ‘पॅरिस’ हे नाव खरेतर आदिशक्तिचे रूप असलेल्या परमेश्वरीदेवीच्या नावापासून लाभले आहे. रोमन सभ्यतेच्या (संस्कृतीच्या) वेळी पॅरिस शहराला ‘पॅरिशोरियम्’ असे संबोधले जायचे. खरेतर हे नाव ‘परमेश्वरी’ या देवीच्या नावाचा अपभ्रंश आहे; कारण पॅरिस हे प्राचीन काळात परमेश्वरीदेवीचे स्थान होते. पॅरिस शहराच्या मध्यभागी सीन् नदीच्या काठी असलेले ‘नोट्रे डेम कॅथेड्रल’ जगप्रसिद्ध आहे. कॅथेड्रल म्हणजे चर्च आणि हे चर्च ‘अवर लेडी ऑफ पॅरिस’ (‘अवर लेडी’ म्हणजे ‘आमची आई’), म्हणजे पॅरिसच्या आईचे स्थान आहे. फ्रान्स देशाच्या लोकांची ‘अवर लेडी ऑफ पॅरिस’ ही देवता फ्रान्स देशाची रक्षकदेवता आहे’, अशी मान्यता आहे. या चर्चच्या आत १० मोठ्या घंटा आहेत. प्रत्येक घंटा एखाद्या खोली एवढी मोठी आहे. या चर्चच्या आतमध्ये १२ राशींची चित्रे आहेत. ‘जर हे चर्च आहे, तर १२ राशींची चित्रे कशी ? किंवा एवढ्या मोठ्या घंटा कशा काय ?’, असा प्रश्न येऊ शकतो. यावरून असे लक्षात येते की, ‘१२ व्या शतकात ख्रिस्ती लोकांनी परमेश्वरीदेवीच्या मंदिराचे ‘अवर लेडी ऑफ पॅरिस’ या चर्चमध्ये रूपांतर केले असावे.’ (संदर्भ : वर्ल्ड वेदिक् हेरिटेज, लेखक
– पु. ना. ओक, पान क्र. ८४४ ते ८४६)
परमेश्वरीदेवीची ‘शृंगार नगरी’ झाली आहे ‘विकृत नगरी’ पॅरीस !‘स्त्री म्हटले की, ‘शृंगार’ आलाच ! पूजेतील देवी असो किंवा घरातील लहान मुली असो, त्यांचा शृंगार करायला सर्वांनाच आवडतो. ‘जगप्रसिद्ध पॅरिस शहर हे एकेकाळी आदिशक्ति देवीचे रूप असलेल्या ‘परमेश्वरी’देवीचे स्थान होते’, असे प्रसिद्ध इतिहासतज्ञ पु.ना. ओक यांनी लिहिले आहे. ‘परमेश्वरीदेवीचे स्थान असलेले पॅरिस शहर ही शृंगार नगरी होती’, यात काहीच दुमत नाही; मात्र आताच्या कलियुगात हे स्थान सात्त्विक शृंगाराच्या ऐवजी विकृत शृंगाराकडे वळले आहे. पॅरिस शहरात कुठल्याही मार्गाने जातांना तेथील महिलांकडे पाहिल्यावर शृंगार या शब्दालाही काळिमा फासणारे विकृत प्रकार, विकृत कपडे आदी दृश्ये दिसतात. जागतिक स्तरावर होणारे ‘फॅशन शो’ यांचे केंद्रबिंदूही पॅरिस शहरच आहे.’ – श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), मडिकेरी, कर्नाटक (२६.५.२०२३) |
‘लॅक्मे’, म्हणजे फ्रेंच भाषेत ‘लक्ष्मी’ होय !‘एक दिवस श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी मला विचारले, ‘‘दादा, ‘लॅक्मे’ म्हणजे काय ?’’ याविषयी जरा शोध घेतल्यावर कळले, ‘लॅक्मे’चे सौंदर्यप्रसाधने सिद्ध करणारे आस्थापन म्हणजे ‘टाटा’ आस्थापन. ‘टाटा’ आस्थापनाचे संचालक श्री. जे. आर. डी. टाटा त्यांच्या नवीन सौंदर्यप्रसाधनाच्या उत्पादनांसाठी नाव शोधत होते. तेव्हा त्यांनी ‘लॅक्मे’ हा फ्रेंच भाषेतील शब्द निवडला. देवी लक्ष्मीला फ्रेंच भाषेत ‘लॅक्मे’, असे म्हटले जाते. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सहज विचारलेल्या प्रश्नातून देवी लक्ष्मी आणि ‘लॅक्मे’ यांचा संबंध लक्षात आला.’ – श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), मडिकेरी, कर्नाटक, २६.०५.२०२३ |
कृतज्ञता
‘हे आदिशक्ति, तू पृथ्वीवर अनेक ठिकाणी भक्तांसाठी प्रगट झाली आहेस. अशाच तुझ्या या दिव्य स्थानाचा महिमा आम्हाला सप्तर्षी आणि प.पू. गुरुदेवांमुळे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामुळे) कळला’, यासाठी आम्ही सर्व साधक सप्तर्षींच्या आणि प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– श्री. विनायक शानभाग