वर्ष २०२३ मधील रथोत्सवाच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना साजेसा रथ बनवण्याची मनातील इच्छा गुरुकृपेने पूर्ण झाल्याची साधिकेला आलेली अनुभूती !
वर्ष २०२३ मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी रथ बनवण्यामागील पूर्वपीठिका !
१. वर्ष २०२२ मधील रथ गुरुदेवांच्या तत्त्वांशी जुळणारा नसल्यामुळे वाईट वाटणे
‘वर्ष २०२२ च्या गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) जन्मोत्सवासाठी मिळालेला रथ पाहून मला वाईट वाटत होते; कारण रथाचा आकार प.पू. गुरुदेवांच्या तत्त्वांशी जुळणारा नव्हता; पण आमच्या समोर दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. त्यामुळे मनात इच्छा झाली, ‘आपणच (सनातन संस्थेने) श्रीविष्णूचा रथ बनवला, तर चांगले होईल.’
२. वर्ष २०२२ मध्ये ‘रथांची बांधणी केवळ लग्नकार्यासाठी केली असल्याने ती सात्त्विक नाही’, असे लक्षात येणे
वर्ष २०२२ मध्ये रथोत्सवासाठी रथ निवडण्यासाठी अनेक ठिकाणी फिरूनही आमच्या मनाला समाधान मिळत नव्हते; कारण जे रथ पाहिले, ते रथ लग्नकार्यासाठी वापरण्यात येत होते. ‘अशा रथात प.पू. गुरुदेवांना, म्हणजेच देवाला कसे बसवायचे ?’, असा प्रश्न मला पडला. आतापर्यंत प.पू. गुरुदेवांशी निगडित प्रत्येक गोष्टीची निवड करतांना साधकांनी सात्त्विकतेच्या स्पंदनांचा अभ्यास केला आहे. बरेच निकष लक्षात घेऊन शेवटी एक रथ निवडला; पण त्याचा आकार दैवी वाटत नव्हता; पण नाईलाजाने जन्मोत्सवासाठी हा रथ भाड्याने आणून वापरला.
३. प.पू. गुरुदेव रथात विराजमान झाल्यावर निर्गुण तत्त्वाच्या अनुभूती येणे
वर्ष २०२२ चा रथोत्सव झाल्यावर एक सूत्र शिकता आले. त्या रथाचा आकार कसाही असला, तरी प.पू. गुरुदेव रथात बसल्यावर रथाच्या त्या आकारातही देवत्व निर्माण झाले होते. त्या रथाच्या माध्यमातून साधकांना अनेक अनुभूती आल्या. ‘भगवंताने साधकांना रथाचा रंग आणि रूप यांच्या पलीकडे नेऊन निर्गुण तत्त्वाची अनुभूती दिली’, असे मला जाणवले.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना साजेसा रथ बनवण्याची इच्छा वर्ष २०२३ मध्ये देवाने पूर्ण करणे
वर्ष २०२२ च्या रथोत्सवाच्या वेळी ‘देवाला साजेसा रथ बनवावा’, अशी तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. त्यामुळे ‘श्रीविष्णूचा रथ कसा असेल ?’, हे देव आपल्याला शिकवेल आणि साधकांना असा रथ पहाता येईल’, असे मला वाटले. त्यानंतर थोड्याच दिवसांनी महर्षींनी ‘रथ बनवायचा आहे’, अशी आज्ञा केल्याचे कळल्यावर मला पुष्कळ आनंद झाला आणि ‘या वर्षी भगवंताने माझी ही इच्छा पूर्ण केली’, असे वाटले.’
– सौ. जान्हवी रमेश शिंदे, फोंडा, गोवा. (२४.५.२०२३)
|