(म्हणे) ‘३४९ वा राज्याभिषेकदिन ३५० वा म्हणून साजरा करणे ही सरकारची ऐतिहासिक चूक !’
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे अज्ञानमूलक वक्तव्य
मुंबई – छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ या दिवशी झाला. वर्ष २०२४ मध्ये राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. असे असतांना ३४९ वा शिवराज्याभिषेकदिन ३५० वा म्हणून साजरा करणे, ही शासनाची ऐतिहासिक चूक आहे, असे अज्ञान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पाजळले. याविषयीचा व्हिडिओ त्यांनी ट्वीटद्वारे प्रसारित केला आहे.
पुढच्या वर्षी सत्तेवर नसणार हे माहित असल्याने शिंदेंनी याच वर्षी ३५० वा राज्याभिषेक आटपून घेतला@mieknathshinde #JitendraAwhad #EknathShinde #shivsena #NCP @Awhadspeaks @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm pic.twitter.com/DOH3Eai5ty
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) June 2, 2023
आव्हाड पुढे म्हणाले की, वर्ष २०२३ मध्ये ३५० वा शिवराज्याभिषेक साजरा करण्याची कल्पना कुणाच्या सुपीक डोक्यातील आहे ? सनातन धर्माचा प्रसार करण्यासाठी तुम्ही शिवरायांच्या राज्याभिषेकाचे वाटोळे करणार का ? यामुळे महाराष्ट्राचा इतिहास धुळीला मिळाला आहे. राज्याभिषेकाच्या सोहळ्यानिमित्त महाराजांना अपमानित करण्यासाठी जे रायगडावर गेले, त्यांनी क्षमा मागावी. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कधी झाला ?, हे ठाऊक नसणार्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर चालते व्हावे. उत्तरेकडून आलेले गागाभट्ट यांनी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक केला. रायगडावर झालेला शिवराज्याभिषेकदिन ही सरकारची ऐतिहासिक चूक आहे. पुढील वर्षी आपण नसणार, याची निश्चिती असल्यामुळे या सरकारने ३४९ वा राज्याभिषेक ३५० म्हणून साजरा केला.
तिथीनुसार ३५० वा राज्याभिषेक साजरा झाला ! – महंत सुधीरदासजी महाराज, राज्याभिषेक सोहळ्याचे प्रधान आचार्य याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने रायगडावरील राज्याभिषेक सोहळ्याचे प्रधान आचार्य म्हणून दायित्व पार पाडणारे महंत सुधीरदासजी महाराज यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, रायगडावर झालेला राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार ३५० वाच आहे. छत्रपती शिवरायांचे वंशज उदनयराजे भोसले यांच्याकडे तिथीनुसार आणि दिनांकानुसार शिवरायांचा राज्याभिषेक कधी आहे ?, याची सर्व आकडेवारी उपलब्ध आहे. ते स्वत: या सोहळ्याला उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या आवाक्यात नसलेल्या भलत्याच गोष्टीत पडू नये. |