मंदिरे आणि धर्मकर्तव्य !
‘देशातील हिंदूंच्या मंदिरांमध्ये स्वच्छता नाही. आपल्याकडील धर्मशाळाही चांगल्या नाहीत’, अशा स्पष्ट शब्दांत मंदिरांच्या दुःस्थितीविषयी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच टिपणी केली आहे. विदेशातील धार्मिक स्थळे भारताच्या तुलनेत पुष्कळ स्वच्छ आणि चांगली असल्याचीही उदाहरणे त्यांनी दिली. धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेच्या दृष्टीने प्रयत्नशील रहाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मंदिरांची दुर्दशा आजपर्यंत कुणाला ठाऊक नव्हती किंवा कुणी त्याविरोधात आवाज उठवला नाही, असे नाही; पण आता मंत्रीमहोदयांच्या सांगण्यामुळे ही स्थिती आता मोठी समस्या म्हणून सर्वांच्या समोर आली आहे. या संदर्भात प्रत्येकानेच गांभीर्याने विचार करायला हवा.
सरकारचे कर्तव्य !
हिंदूंच्याच मंदिरांमध्ये अशी अस्वच्छता का ? याचा सरकारने कधी विचार केला आहे का ? स्वच्छता नसणे म्हणजे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी हिंदूंना स्वयंशिस्त न लावल्याचाच हा परिणाम आहे, हे सरकारने लक्षात घ्यायला हवे. आता स्वयंशिस्त लावण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. केवळ इतक्यावरच थांबून चालणार नाही; कारण हिंदूंची अनेक मंदिरे आज सरकारच्या कह्यात आहेत. ‘या सरकारीकरणातून मंदिरांना मुक्त करायला हवे’, अशी समस्त हिंदूंची मागणी आहे. हिंदूंची ही मागणी नितीन गडकरी आपल्या सरकारपर्यंत पोचवतील का ? हिंदूंच्या मंदिरांमध्ये होणार्या चोर्या, मंदिरे किंवा देवतांच्या मूर्ती यांची केली जाणारी विटंबना, नासधूस यांच्या विरोधातही सरकारने प्रयत्न करायला हवेत. आज अनेक मंदिरे ही धार्मिक स्थळे न होता सहलीची किंवा मौजमजेची ठिकाणे झालेली आहेत. त्यामुळे अनेक लोक तेथे ‘सेल्फी’ काढणे किंवा फिरणे यांसाठी येतात; पण त्यांचा धार्मिक उद्देश लोप पावलेला असतो. धर्मभावनाच नसेल, तर मंदिरांप्रतीची कर्तव्ये कोण पार पाडणार ? हे टाळण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था सरकारने निर्माण करायला हवी. ‘सरकारीकरण झालेल्या मंदिरांमधील निधीचा वापर कुठे आणि कशा स्वरूपात केला जातो ? जर मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी जमा होतो, तर तो आवश्यक गोष्टींसाठी का वापरला जात नाही ?’, असे अनेक प्रश्न प्रत्येक हिंदूंच्या मनात आहेत. मंदिरे हिंदूंंच्या नियंत्रणात आल्यावर धर्मशिक्षण देणे, मंदिरांची सर्वतोपरी काळजी घेणे, जतन-संवर्धन करणे ही दायित्वे भाविक हिंदू निश्चितच पार पाडतील, हे वेगळे सांगायला नको. यामुळे ‘एक साधे, सब साधे’ हेच मंदिरांच्या दुःस्थितीवरील उत्तर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून श्रीराम मंदिराच्या पुनर्निर्मितीसाठी हे सरकार झटत आहे. येत्या काही मासांतच भव्यदिव्य श्रीराम मंदिर साकारलेले आपल्याला पहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर हिंदूंचे प्रत्येक मंदिर भव्यदिव्य असेच व्हायला हवे. मंदिरांच्या माध्यमातून आध्यात्मिक ऊर्जा, चैतन्य लाभत असल्यानेच आज हिंदु धर्म आणि पर्यायाने हिंदू जिवंत आहेत. त्यामुळे मंदिरांचा लाभ करून घेणे, हे हिंदूंना धर्मदृष्टी देणारे, साधनेत साहाय्य करणारे, साधनेसाठी प्रोत्साहित करणारे, धर्मशिक्षण देणारे, धर्माचरणासाठी उद्युक्त करणारे आणि हिंदूंमध्ये राष्ट्राभिमान जागृत करणारे असते. मंदिरे म्हणजे हिंदूंच्या जीवनाला सर्वांगीण दृष्टी देणारी पाठशाळाच असते. यातूनच मंदिरांचे सामर्थ्य लक्षात येते. मंदिरांद्वारे मिळणारी धार्मिक फलनिष्पत्ती पहाता तेथील प्रत्येक गोष्टीसाठी हिंदू, स्थानिक प्रशासन आणि पर्यायाने सरकारही तितकेच उत्तरदायी आहे. नितीन गडकरी यांनी मंदिरांमधील स्वच्छता आज उघड केल्यामुळे त्या विषयाकडेही लक्ष द्यायलाच हवे. प्रत्येकाने धर्मभान जोपासून दायित्वाने प्रयत्न करावेत.
हिंदूंचे दायित्व !
मंदिर म्हटले की, आपल्याला जाणवते ते पावित्र्य, मांगल्य, सात्त्विकता आणि भक्तीभाव ! हे सर्व मंदिरातच अनुभवता येते. त्यासाठी अर्थातच तेथे स्वच्छता, टापटीपपणा आणि नीटनेटकेपणा असायला हवा. त्यासाठी झटणे हे हिंदु धर्मीय असणार्या प्रत्येकाचेच आद्यकर्तव्य आणि धर्मकर्तव्य आहे, हे लक्षात घ्यायला हवे ! सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात सुख, समाधान आणि शांती यांचा शोध घेतला जातो. ‘हे सर्व केवळ मंदिरातच प्राप्त होते’, हे जाणून हिंदू मंदिरात येतात, देवाकडे प्रार्थनारूपी याचना करतात, प्रसाद घेतात आणि निघून जातात. काही काळाने मनोकामना पूर्ण झाली, तर पुन्हा येऊन दर्शन घेऊन जातात; परंतु ‘देवाचा वास असणार्या मंदिरांचे आपणही काही देणे लागतो कि नाही ?’, याचा विचारच त्यांच्या मनात येत नाही. त्यामुळे तेथे स्वच्छता राखणे, हे तर दूरचेच. हिंदूंमध्ये धर्मप्रेम, धर्मशिक्षण आणि धर्माभिमान यांचा अभाव असल्यामुळे हिंदूंना धर्मकर्तव्याची जाणीवच नसते. यासाठी वेळोवेळी जागृती केल्यासच मंदिरांमध्ये स्वच्छता टिकून राहू शकते. प्रत्येक हिंदु हा समाज आणि कुटुंब यांविषयीची कर्तव्ये पार पाडत असतो; पण धार्मिक गोष्टींच्या संदर्भात तो उदासीन असतो. हिंदूंनी या स्थितीतून बाहेर पडून ‘मंदिरासाठी मी कसे योगदान देऊ ? मंदिररक्षणाच्या कार्यात मी कसा सहभागी होऊ ?’, अशी विचारप्रक्रिया करायला हवी. तसे झाल्यास मंदिरांमध्ये स्वच्छता राखली जाऊन पावित्र्य टिकून राहील आणि ईश्वराची कृपा संपादन करता येईल. हिंदूंमधील संघटितपणाही वाढीस लागेल.
हिंदूंनी मंदिरांच्या संदर्भात निष्काळजी रहाता कामा नये. आपण जसे स्वतःचे घर स्वच्छ ठेवतो, तसे मंदिरांमध्ये स्वच्छता राखण्यासाठीही कृतीशील व्हावे आणि त्या दृष्टीने अन्यांचेही प्रबोधन करावे. धर्मभावना दुखावल्या गेल्यास अतीसहिष्णु वृत्ती न बाळगता हिंदूंनी सरकारला वेळोवेळी प्रतिप्रश्न केला पाहिजे. त्याविरोधात वैध मार्गाने आवाज उठवला पाहिजे. आपल्याच संस्कृतीची हत्या होतांना पाहू नये. धर्माविषयी सजग आणि सतर्क रहा ! तसेच याच्या जोडीला ‘मंदिरे सरकारीकरणातून मुक्त’ होण्यासाठी लढा द्या !