नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या विरोधात न्यायालयात दावा प्रविष्ट करणार ! – सीताराम गावडे, संपादक, कोकण लाईव्ह ब्रेकिंग
सावंतवाडीतील जलतरण तलावात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) – येथील नगरपालिकेच्या जलतरण तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी जलतरण तलावाच्या ठेकेदाराप्रमाणेच ठेका देतांना योग्य ती प्रक्रिया न करणारे तत्कालीन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्यासह संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा, अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात मुख्याधिकारी आणि पोलीस प्रशासन यांना प्रतिवादी करून दावा प्रविष्ट करावा लागेल, अशी चेतावणी कोकण लाईव्ह ब्रेकिंगचे संपादक तथा मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी दिली आहे.
नगरपालिकेच्या जलतरण तलावाचा ठेका देतांना कागदपत्रांची खात्री न करता चुकीच्या पद्धतीने ठेका दिला होता. याविषयी तक्रार नोंदवूनही त्याची नोंद तत्कालीन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी घेतली नाही. त्यांच्या या निष्काळजीपणामुळेच जलतरण तलावात बुडून एका युवकाला जीव गमवावा लागला. या प्रकरणी पोलीस प्रशासनाने ठेकेदारावर गुन्हा नोंद केला असला, तरी ठेकेदाराच्या संपूर्ण कागदपत्रांची आणि त्यांच्या सत्यतेची पडताळणी केली नाही. कुणाच्या तरी दबावाला, आमिषाला बळी पडून हा ठेका दिला गेला. त्यामुळे ठेका देणारी यंत्रणा, सावंतवाडी नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना निलंबित करून त्यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा.