हरमल टेकडीवर श्री परशुरामाचा पुतळा उभारा ! – संजय हरमलकर, प्रख्यात चित्रकार, गोवा
पणजी, १ जून (वार्ता.) – कोकण भूमीचे निर्माते भगवान श्री परशुराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हरमल येथील परशुराम टेकडीच्या परिसरात भगवान श्री परशुराम यांच्या पावन स्मृती चिरंतन कराव्यात. गोवा सरकारने त्या ठिकाणी भव्य पुतळा उभारून तो भाग पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावा, अशी मागणी सुप्रसिद्ध चित्रकार तथा भाजपचे नेते संजय हरमलकर यांनी केली आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी हल्लीच या ठिकाणी भगवान परशुरामाचे प्रतीक म्हणून धनुष्य आणि बाण यांची प्रतिकृती उभारणार असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर संजय हरमलकर यांनी ही मागणी केली.
संजय हरमलकर पुढे म्हणाले, स्थळाच्या परिसरात भगवान परशुरामाच्या आठवणींना उजाळा देणारी दृश्ये चित्राच्या रूपात कोरावीत आणि यात गोमंतकीय कलाकारांना वाव द्यावा. हा प्रस्ताव मी पूर्वी माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्याकडे मांडला होता आणि त्यांना हा प्रस्ताव आवडला होता; मात्र मनोहर पर्रीकर यांना त्या वेळी केंद्रशासनात संरक्षण मंत्रीपद देण्यात आले होते. यानंतर पर्रीकर यांच्या सांगण्यावरून तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडे या प्रस्तावावर चर्चा झाली आहे.
परशुराम टेकडीवर भगवान परशुराम यांच्या खुणा अद्याप जिवंत आहेत. या ठिकाणी १० सहस्र चौ.मी. भूमी आरक्षित करून ५ सहस्र चौ.मी. भूमीत धनुष्यबाणधारी भगवान परशुरामाचा भव्य पुतळा उभारावा. इमारतीवर भव्य पुतळा उभारावा आणि इमारतीत भगवान परशुराम यांची चित्रे रेखाटावीत. यामुळे पर्यटनाला वाव मिळण्यासमवेतच स्थानिकांना रोजगार मिळू शकेल.
हे वाचा –
♦ मांद्रे, पेडणे येथे ‘धनुष्य आणि बाण’ यांची भव्य प्रतिकृती उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे, गोवा
https://sanatanprabhat.org/marathi/685631.html