छत्रपती संभाजीनगर येथे वाहनचालकांकडून पोलिसांच्या वसुलीचा व्हिडिओ विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून ट्वीट !
छत्रपती संभाजीनगर – समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार्या वाहनचालकांना अडवून त्यांच्याकडून पैशांची वसुली केली जात आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्वीट करत केला आहे, तर पोलिसांकडून कशाप्रकारे वसुली चालू असते ? याचा व्हिडिओही दानवे यांनी ट्वीट केला आहे. त्यांच्या याच आरोपांनंतर या प्रकरणाची चौकशी चालू करण्यात आली आहे, अशी माहिती महामार्ग पोलीस अधीक्षक अनिता जमादार यांनी पत्रकारांना दिली.
समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद़्घाटन होऊन ५ मासांहून अधिक कालावधी झाला आहे. अल्प वेळेत अधिक अंतर प्रवास करण्यासाठी समृद्धी महामार्ग लाभाचा ठरेल, अशी अपेक्षा सरकारला होती; मात्र उलटच चित्र पहायला मिळत आहे; कारण महामार्ग पोलीसच येथे वसुली करत आहेत. ‘समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळेल’, अशी वल्गना सरकारची होती; पण रोजगार असलेल्या लोकांना अशी ‘समृद्धी’ येईल, हे सरकारने नव्हते सांगितले. गतीमान महाराष्ट्र कसा ? तो असा !..’, असे दानवे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळेल अशी वल्गना सरकारची होती. पण रोजगार असलेल्या लोकांना अशी ‘समृद्धी’ येईल, हे नव्हतं सरकारने सांगितलं. गतिमान महाराष्ट्र कसा? तो असा!#samruddhi #expressway #समृद्धी@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @DGPMaharashtra pic.twitter.com/iIsSQeUxbQ
— Ambadas Danve (@iambadasdanve) May 31, 2023
काय आहे व्हिडिओत ?
व्हिडिओत १ पोलीस वाहनचालकाकडून काहीतरी घेऊन खिशात घालत असल्याचे दिसत आहे. दुसर्या ठिकाणीही २ पोलीस असे करत असल्याचे दिसून आले. मोठ्या वाहनांचे चालक किंवा साहाय्यक यांना खाली उतरवून त्यांच्याकडून पैसे घेऊन ते खिशात घातले जात आहेत. ४-५ जणांना रोखून अशी कृती पोलीस करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
संपादकीय भूमिकाजी गोष्ट अंबादास दानवे यांनी दिसते, ती गोष्ट सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलीस अधिकार्यांना दिसत नाही का ? पोलीस आंधळेपणाची भूमिका का घेत आहेत ? पोलिसांच्या अशा भ्रष्ट वर्तनामुळे जनतेचा पोलिसांवरील विश्वास उडत आहे. वाहनचालकांची लूट करणार्या अशा पोलिसांना बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली पाहिजे. |