पुणे शहरातून एका सप्ताहामध्ये १० अल्पवयीन मुलींसह ३ मुले बेपत्ता !
१४ ते १७ वर्षे वयोगटातील मुलींची संख्या अधिक
पुणे – शहरातून २४ मे या एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये ४ मुली आणि १ मुलगा असे ५ जण घरातून निघून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या ५ जणांसह मागील सप्ताहामध्ये १० अल्पवयीन मुलींसह ३ मुले बेपत्ता झाल्याची पोलिसांमध्ये नोंद झाली आहे. पोलिसांच्या आकडेवारीनुसार मागील अडीच वर्षांमध्ये १ सहस्र २३३ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यातील ६६३ मुली घरी परतल्या असून अद्यापही ५५० मुली बेपत्ता आहेत. यामध्ये १४ ते १७ वर्षे वयोगटातील मुलींचे प्रमाण अधिक आहे; मात्र यात मानवी तस्करी, धार्मिक किंवा जातीयता असा काही प्रकार आढळून आला नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे म्हणाले, ‘‘बहुतांश अल्पवयीन मुली प्रेम प्रकरणातून निघून गेल्याचे अन्वेषणामध्ये आढळते. काही किरकोळ वादातून घराबाहेर जातात. प्रामुख्याने गरिबी, शिक्षणाचा अभाव आणि पालकांचे दुर्लक्ष ही कारणे आहेत.’’ (मुलांकडे लक्ष ठेवणे आणि त्यांच्यावर लहानपणापासून संस्कार करणे किती आवश्यक आहे? याचे महत्त्व पालकांनी जाणणे आवश्यक आहे ! – संपादक)