रायगडावरील ‘गाईड्स’ना शिवसेनेकडून दिले जाणार आरोग्य विम्याचे संरक्षण !
मुंबई – रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वर्षानुवर्षे सांगणार्या २२ गाईड्सना वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या वतीने वार्षिक ५ लाख रुपयांचे आरोग्य विम्याचे संरक्षण दिले जाणार आहे. २ जून या दिवशी रायगडावरील शिवराज्याभिषेकाच्या मुख्य सोहळ्याच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आरोग्य विमा संरक्षण पत्र त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. या विम्यामध्ये सर्व आजारांवरील उपचारांचाही समावेश करण्यात आला आहे. या विमा संरक्षणामध्ये ‘गाईड्स’च्या कुटुंबियांचाही समावेश आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या वतीने प्रतिवर्षी रायगडावरील सर्व ‘गाईड्स’ना गणवेश दिला जातो, तसेच शिवरायांच्या पूजाअर्चेचे साहित्य दिले जाते.