शरिराप्रमाणे मनाचेही लसीकरण करा !
मनाचे लसीकरण हे ऐकून आपल्याला थोडेसे वेगळे वाटेल. आपण शरिराचे लसीकरण करून घेतो; कारण आपल्याला आजार होऊ नये, असे आपल्याला वाटते. व्याधींचा प्रतिबंध करण्याचे काम लस करत असते. लस ही पुन्हा व्याधी होऊ देत नाही किंवा व्याधी झालीच, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ देत नाही. मग आता मनाचे लसीकरण म्हणजे नेमके काय ? ते या लेखामधून आपण समजून घेणार आहोत. आपण बघतो की, सध्या वाढणारा ताणतणाव, काळजी, भय इत्यादींमुळे कमी वयातच हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारखे आजार वाढतांना आपल्याला दिसत आहेत. या आजारांना प्रतिबंध म्हणून मनाचे लसीकरण आवश्यक ठरते.
महर्षि सुश्रुतांनी ‘सुश्रुतसंहिते’मध्ये स्वस्थ व्यक्तीची व्याख्या सांगितलेली आहे – समदोष: समाग्निश्च समधातुमलक्रिय: । – सुश्रुतसंहिता, सूत्रस्थान, अध्याय १५, श्लोक ४१ अर्थ : शरिरातील दोष, धातू, मल, अग्नी यांच्या क्रिया सामान्य असणे, तसेच मन, आत्मा आणि इंद्रिये प्रसन्न असणे, हे स्वस्थ प्रकृतीचे लक्षण आहे. आधीच्या लेखांमधून आपण शरिरातील दोष, धातू, अग्नी म्हणजे काय ? हे समजून घेतलेले आहे. ते जेव्हा प्रमाणात असतात, तेव्हा आपले आरोग्य टिकून रहाते आणि त्यांचे प्रमाण बिघडले, तर आपल्याला रोग होतात. सुश्रुत म्हणतात की, आत्मा, इंद्रिय आणि मन हे सुद्धा प्रसन्न असणे, स्वस्थ रहाण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. फक्त शरिरातील दोषच समप्रमाणात असले, म्हणजे आरोग्य, असे नसून यामध्ये मन आणि इंद्रियांच्या आरोग्याचा सुद्धा विचार करणे आवश्यक असते. एखादी व्यक्ती शरिराने बळकट असेल; परंतु मनाने मात्र खचलेली असल्यास आपण तिला स्वस्थ व्यक्ती म्हणू शकत नाही. |
१. शरीर, इंद्रिये आणि मन यांचा संबंध
मनाच्या प्रेरणेने आपल्या शरिरातील पंचज्ञानेंद्रिये (नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा) त्यांचे ज्ञान ग्रहण करतात. त्यानुसार ते ज्ञान साठवून ठेवणे, योग्य-अयोग्य यांचा विचार करणे, असे कार्य मन करत असते. शरीर व्यापार नीट चालण्यासाठी आपल्याला इंद्रिये आणि मन यांचे आरोग्य राखावे लागते. सर्वप्रथम आपण इंद्रियांचे आरोग्य कसे राखावे, ते समजून घेऊया.
ज्याप्रमाणे आपण घरातील खिडक्यांमुळे बाहेरचे जग बघू शकतो, त्याचप्रमाणे ज्ञानेंद्रिये आपल्या शरिराच्या खिडक्या आहेत. डोळ्यांनी बघणे, कानांनी ऐकणे, नाकाने वास घेणे, त्वचेने स्पर्शज्ञान होणे आणि जिभेने चव घेणे, ही ज्ञानेंद्रियांची कार्य आहेत. ज्ञानेंद्रियांचे कार्य व्यवस्थित होत असेल, तरच आपल्याला योग्य ज्ञान मिळेल. यासाठी ज्ञानेंद्रियांची नियमित काळजी घेणे आवश्यक आहे.
१ अ. डोळे : सध्या आपण बघतो की, अगदी लहान मुलांनाही चष्मा लागलेला असतो. योग्य उजेडामध्ये वाचन करणे, योग्य अंतरावरूनच टिव्ही बघणे, मैदानी खेळांची आवड निर्माण करणे, डोळ्यांचे नियमित व्यायाम आणि त्राटक करणे यांमुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य अबाधित राहू शकते.
१ आ. कान आणि नाक : यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी त्यांचे नियमित स्नेहन म्हणजे कान अन् नाक यांमध्ये २ -३ थेंब कोमट तेल घालावे.
१ इ. त्वचा : ही बळकट आणि सतेज ठेवण्यासाठी अंंघोळीपूर्वी अंगाला नियमित तेल लावून मसाज करावा. यामुळे त्वचा मृदू रहाते आणि अकाली सुरकुत्या पडत नाहीत. त्वचेला तेल लावून मुरल्यानंतर तेलकटपणा निघून जावा, यासाठी डाळीचे पीठ, नागरमोथा आणि आवळा चूर्ण त्वचेला चोळावे.
१ ई. जीभ : दात घासल्यानंतर नियमितपणे जिभेची स्वच्छताही करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिभेचे आरोग्य अबाधित रहाते.
वरीलप्रमाणे आपल्या इंद्रियांची काळजी घेतल्यास त्यांची कार्यक्षमता वाढते. इंद्रियांचा वापर योग्य ठिकाणी योग्य प्रमाणातच व्हायला हवा. अल्प प्रकाशात पुष्कळ वेळ वाचन करणे; पुष्कळ वेळ टिव्ही, भ्रमणभाष, भ्रमणसंगणक (लॅपटॉप) बघणे, पुष्कळ वेळ कानाला हेडफोन लावून गाणी ऐकणे, अतीकर्कश आवाजात गाणी ऐकणे, अतीप्रमाणात चमचमीत पदार्थ खाणे, अतीऊन आणि अतीथंड वातावरणात बाहेर पडणे, त्वचेला अजिबातच ऊन लागू न देणे, हे सर्व इंद्रियांचे आरोग्य बिघडण्यास कारणीभूत घटक आहेत. आता मनाविषयी थोडे जाणून घेऊया !
२. मनाचे कार्य बिघडल्यास प्रज्ञापराध (बुद्धीने चुकीचा निर्णय घेणे) होऊन पुढे रोग निर्माण होणे
आयुर्वेदामध्ये शरिराइतकेच मनाला महत्त्व दिलेले आहे. आपले संपूर्ण शरीर हे मनाचे स्थान आहे. मनावर कुठलाही परिणाम झाल्यास ते शरिरावरही दिसून येतात म्हणून स्वास्थ्य रक्षणामध्ये शरिरासह मनही महत्त्वाचे आहे.
रोग होण्यामध्ये ‘इंद्रियमोह’ हे एक महत्त्वाचे कारण आहे. इंद्रियमोह म्हणजे काय ? तर आपल्या ज्ञानेंद्रियांचा अयोग्य किंवा चुकीच्या गोष्टींशी संयोग होणे. उदाहरणार्थ सतत बाहेरचे भेळपुरीसारखे पदार्थ खाणे. यामध्ये जिभेला सतत बाहेरचे खाण्याचा इंद्रियमोह होतो. दुसरे कारण म्हणजे प्रज्ञापराध – प्रज्ञा म्हणजे बुद्धी. स्वतःचे योग्य आणि अयोग्य याचे निर्णय घेण्याचे काम बुद्धी करत असते. जर आपण योग्य कृती केली, तर इंद्रियमोह होणार नाही; पण बुद्धीने चुकीचा निर्णय घेतला, तर मात्र इंद्रियमोह होऊन पुढे आजार निर्माण होतात.
प्रज्ञापराध टाळण्यासाठी काय करावे ? धी, धृती आणि स्मृति ही मनाची कार्ये आहेत.
अ. धी : योग्य आणि अयोग्य याचा विचारविनिमय करणे. उदा. मी जे खात आहे ते माझ्या शरीरासाठी योग्य कि अयोग्यआहे ? माझी कृती माझ्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे कि नाही ? इत्यादी.
आ. धृती : मनाने घेतलेला निर्णय कार्यवाहीत आणण्याचे सामर्थ्य म्हणजे धृती होय. उदा. सिगारेट, दारू सोडण्याचा निश्चय कृतीमध्ये आणणे, बाहेरचे अन्न न खाण्याचा निर्णय प्रत्यक्ष कृतीमध्ये आणणे, नियमित व्यायाम करण्याचा निर्णय घेणे इत्यादी.
इ. स्मृति : आपल्याला नेमक्या कोणत्या गोष्टीने त्रासहोतो ? त्याची आठवण ठेवून त्रासदायक गोष्टींचा त्याग करणे. उदाहरणार्थ तिखट खाऊन जळजळते, हे आठवून तिखट चमचमीत पदार्थ न खाणे. मधुमेह रुग्णांना गोड खाण्याचा मोह आवरत नाही, हे आपण बर्याच ठिकाणी बघतो.
धी, धृती आणि स्मृति यांपैकी एक जरी कार्य बिघडले, तरी चुका होतात, प्रज्ञापराध घडतो आणि पुढे रोग निर्माण होतात.
३. षड्रिपूंवर ताबा मिळवल्यास मनाची प्रसन्नता आणि आरोग्य अबाधित राहू शकणे
मन निरोगी आणि प्रसन्न रहाण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही मानसिक वेगांचे धारण करावे, असे सांगितले आहे. राग, लोभ, द्वेष, मद, मोह, मत्सर हे ६ षड्रिपू आहेत. त्यांच्यामुळे आपले मानसिक आरोग्य बिघडते. उदाहरणार्थ जसे की,
अ. राग : आपल्याला सतत राग येत असल्याने घरामध्ये कलह होणे, मनाप्रमाणे न झाल्यास इतरांवर चिडचिड करणे इत्यादी.
आ. लोभ : ‘अमुक एक गोष्ट मला मिळालीच पाहिजे’, या अट्टाहासाने कोणत्याही थराला जाणे.
इ. द्वेष : दुसर्याची हानी करण्याचा प्रयत्न करणे.
ई. मत्सर : दुसर्याचे दुःख पाहून प्रसन्नता वाटणे.
आपण जर षड्रिपूंवर ताबा मिळवला, तर मनाची प्रसन्नता टिकून मनाचे आरोग्य अबाधित राहू शकते.
४. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया म्हणजेच मनाचे लसीकरण !
जसे आपण शरिरामध्ये वात, पित्त, कफ हे प्रकृतीदोष बघितले, तसेच प्रत्येक व्यक्तीमध्ये सत्त्व, रज आणि तम या तीनही गुणांचे प्रमाण वेगवेगळे असते अन् त्यानुसार त्यांचा स्वभाव असतो. आपल्या स्वभावानुसार आपली विचारप्रक्रिया होत असते आणि त्याचा परिणाम आपल्या शरिरावर होतो. एखादी सात्त्विक स्वभावाची व्यक्ती असेल, तर ती मनाने स्थिर, शांत, योग्य कृती करणारी आणि नियमबद्ध अशी असते. अशा व्यक्तीचे आरोग्य दीर्घकाळापर्यंत चांगले रहाते. राजसिक आणि तामसिक स्वभाव असणार्या व्यक्तींनी स्वतःला सात्त्विक स्वभावाकडे नेण्यास प्रयत्न करावा. आपण म्हणतो की, स्वभावाला औषध नाही; परंतु गुरुमाऊलींनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) आपल्याला सांगितलेल्या स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेमुळे स्वभावात पालट करणे शक्य आहे, हे शिकवले आहे. चिंता, काळजी, भय, निराशा, ताणतणाव हे मनावर परिणाम करणारे घटक स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेमुळे नक्कीच न्यून होऊ शकतात; म्हणून ही प्रक्रिया म्हणजेच मनाचे लसीकरण आहे. या प्रक्रियेमुळे मनाचे दोष न्यून होऊन मन प्रसन्न व्हायला लागते आणि आरोग्याच्या दृष्टीने मन प्रसन्न असणेही तेवढेच आवश्यक आहे. तेव्हा सर्वांनी आपल्या मनाचे लसीकरण अवश्य करावे.
नियमबद्ध रहाणे आणि धर्माचरण करणे, हेच आरोग्यमय अन् यशस्वी जीवन जगण्याचे उपाय आहेत; कारण नियमबद्ध राहिल्याने आपले शरीर निरोगी रहाते आणि धर्माचरण केल्याने आपल्या मनाचे आरोग्य चांगले रहाते.
– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे. (२८.५.२०२३)