सनातनच्या आश्रमात राहिल्यावर साधकाला आईकडून मिळालेल्या प्रेमापेक्षाही अधिक प्रेम आणि आनंद मिळणे !
सनातनच्या आश्रमात रहायला आल्यावर नवीन साधकांनाही आश्रमातील संत आणि साधक यांचा आधार वाटतो. त्यामुळे ते आनंदी जीवन व्यतीत करू शकतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सर्व संत आणि साधक यांनाही त्यांच्याप्रमाणेच प्रेमळ घडवले आहे. त्यामुळे नवीन साधकांनाही साधना करण्यासाठी चांगली उभारी मिळते. सनातनच्या ६९ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांना देवद आश्रमातील एका साधकाने याविषयी सांगितलेले वैशिष्ट्यपूर्ण सूत्र येथे दिले आहे.
१. लहानपणी आईचे निधन झाल्यामुळे आईच्या प्रेमाची उणीव भासणे
‘देवद आश्रमातील एका साधकाशी साधनेविषयी बोलतांना ते मला म्हणाले, ‘‘मी लहान असल्यापासून माझी आई सतत रुग्णाईत असे. मी इयत्ता बारावीत असतांना तिचे निधन झाले. त्यामुळे मला आईच्या प्रेमाची उणीव जाणवून ‘मला आईचे प्रेम मिळाले नाही’, असे सतत वाटत असे.’’
२. आश्रमातील साधकांचा सहवास आणि प्रेम यांमुळे आईच्या प्रेमाची जाणवणारी उणीव संपण
ते साधक मला पुढे म्हणाले, ‘‘मी आश्रमात रहायला आल्यापासून मला एवढे मोठे कुटुंब मिळाले. आश्रमातील साधकांचा सहवास मिळाला. माझी प्रकृती अबोल आणि इतरांमध्ये न मिसळणारी आहे. मी फार मिसळणारा नसलो, तरी साधक माझ्याशी मोकळेपणाने बोलतात. ते मला सेवेत सहभागी करून घेतात. त्यामुळे हळूहळू माझाही आश्रमातील सहभाग वाढू लागला आहे. ‘आश्रमातील सेवांमध्ये पुढाकार घेऊया’, असे मला वाटायला लागले आहे. साधकांचा सहवास आणि प्रेम यांमुळे मला आईच्या प्रेमाची जाणवणारी उणीव संपली. आश्रमातील साधकांमुळे मला आईच्या प्रेमापेक्षाही पुढचा आनंद मिळत आहे.’’
– (पू.) सौ. अश्विनी पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.२.२०२३)