जळगाव येथे बँकेवर दरोडा घालून १७ लाखांची रोकड पळवली !
बँकेच्या व्यवस्थापकावर प्राणघातक आक्रमण !
जळगाव – शहरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाजवळील स्टेट बँकेवर दरोडेखोरांनी दरोडा घालून १७ लाख रुपयांची रोकड पळवली. या वेळी दरोडेखोरांनी बँकेच्या व्यवस्थापकांच्या मांडीवर कोयत्याने आक्रमण करून त्यांना गंभीर घायाळ केले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. ही घटना सकाळी ९.३० वाजता घडली.
सकाळी ९ वाजता बँक उघडल्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी बँकेत आले. ग्राहकांचीही वर्दळ होती. बँक उघडून अर्धा घंटा झाल्यानंतर दुचाकीवर आलेल्या २ दरोडेखोरांनी कर्मचार्यांना शस्त्राच्या साहाय्याने धमकावले. दहशत निर्माण करण्यासाठी बँक व्यवस्थापकाच्या मांडीवर कोयत्याने वार केले. त्यामुळे ग्राहक आणि कर्मचारी घाबरले. पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध चालू केला आहे. यांनतर पोलीस अधीक्षक एम्. राजकुमार, पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत गवळी, ‘एम्.आय.डी.सी.’चे प्रभारी शंकर शेळके यांनी घटनास्थळाची पहाणी केली. श्वानपथकाने शोध घेतला. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.