विद्यार्थीदशा महत्त्वाची !
देवाने निर्मिलेल्या जगात पुष्कळ काही शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. आपला जन्म होतो त्या वेळी आपल्याला काहीच समजत नसते. लहानपणी आई-वडील आपल्याला शिकवतात, त्यानंतर आपण शाळेत जातो, तेथे शिक्षक ज्ञान देतात. या वयात ‘आपल्याला काही येत नाही’, याची जाणीव प्रबळ असते. त्यामुळे विद्यार्थीदशेत सर्वच जण पुष्कळ प्रमाणात ज्ञान ग्रहण करतात. जसजसे आपण मोठे होत जातो, तसतसे ‘मला येते’, ही जाणीव वाढते आणि ज्ञान ग्रहण होण्याची प्रक्रिया कुठेतरी थांबते; परंतु याला अपवादही आहे.
मनुष्य अहंकारापोटी जेवढे ठाऊक आहे, तेवढ्यावरच स्वतःला पूर्ण ज्ञानी समजतो. त्यामुळे जिज्ञासा अल्प होऊन बर्याच गोष्टींकडे दुर्लक्ष होते. तेव्हा मनुष्य दुसर्यांचे ऐकणे बंद करून देतो. आपण इतरांचे ऐकणे आणि त्यातून शिकणे चालू ठेवल्यास आपल्यात व्यापकता येते. त्यासाठी वाचन, वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधणे, अभ्यास करून कृती केल्यास आपल्या ज्ञानात भर पडते. अखंड ज्ञान घेत घेत भगवंत निर्मित सृष्टीची विविधता जाणून घेतल्यास आनंदात भर पडते. यासाठी मनाची विद्यार्थीदशा सतत जागृत असायला हवी.
आम्ही एक म्युझियम बघायला गेलो. नाशिकमधील ‘गारगोटी म्युझियम’ अप्रतिम आहे. ईश्वराने प्रत्येक दगडात किती सौंदर्य भरलेले आहे, हे त्या म्युझियममध्ये गेल्यावर लक्षात आले. आपल्याला लहानपणी खेळतांना कितीतरी गारगोट्या मिळाल्या आणि आपण त्या फेकून दिल्या; पण आपल्या लक्षात कधीच आले नाही की, या गारगोटीच्या आतही काही तरी असू शकते.
निसर्गातील पंचमहाभूते म्हणजे एक शिकण्याचे महाविद्यालयच आहे. तेव्हा त्यातून काय घ्यावे ? काय नको ? यासाठी पारखी नजरच असायला हवी. एखादे ध्येय घेऊन त्या मार्गाने जात असतांना अनेक अडचणींचा सामना करत एखादी गोष्ट घडते ती किती भव्य आणि दिव्य असते, हे ‘गारगोटी म्युझियम’ बघून लक्षात आले.
सांगायचे तात्पर्य असे की, आपल्या जीवनात काही भव्य दिव्य घडायचे असेल, तर त्या गोष्टीचे ध्येय घेणे अत्यंत आवश्यक आहे. मग ते ईश्वरप्राप्तीचे असो की, वैभवप्राप्तीचे ! त्यासाठी त्या त्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तीकडून शिकून, समजून, ध्येय घेऊया आणि विद्यार्थीदशेत असतांना जसा शिकण्यातील आनंद घेत होतो तसाच आनंद जीवनभर घेत राहूया ! यामुळे वैयक्तिक जीवन आणि सामाजिक जीवन वैभवशाली होईल !
– सौ. रमा देशमुख, नागपूर