कोकण रेल्वेमार्गावर ५ जूनपासून ‘वन्दे भारत एक्सप्रेस ’ चालू होणार
जिल्ह्यात रत्नागिरी आणि खेड येथे थांबणार
रत्नागिरी – कोकण रेल्वे मार्गावरील पहिल्या मडगाव-मुंबई सी.एस्.एम्.टी. ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ला ३ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे सकाळी १०.३० वाजता हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर ५ जूनपासून ही गाडी प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी चालू होणार आहे. या गाडीला रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी आणि खेड असे २ थांबे देण्यात आले आहेत.
कोकण रेल्वे मार्गावर लवकरच धावणार वंदे भारत एक्सप्रेस https://t.co/jkpVkHrZkZ via @Goa News Hub
— Goa News Hub (@goanewshub) May 30, 2023
रेल्वे प्रशासनाच्या सद्याच्या नियोजनानुसार ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ आठवड्याला ६ दिवस चालवण्यात येणार आहे. मडगाव, थिविम्, कणकवली, रत्नागिरी, खेड, पनवेल, ठाणे, दादर, मुंबई सी.एस्.एम्.टी. या स्थानकांवर ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ थांबेल. ही गाडी सी.एस्.एम्.टी. वरून सकाळी ५.३५ ला सुटेल आणि मडगाव येथे दुपारी १.१५ वाजता पोचेल. त्यानंतर लगेच मडगाववरून हीच गाडी दुपारी २.३५ वाजता मुंबईकडे रवाना होईल आणि रात्री १०.२५ वाजता मुंबई सी.एस्.एम्.टी. स्थानकात पोचेल. वंदे भारत एक्सप्रेस केवळ ७ तास ५० मिनिटांत मुंबई ते मडगाव हे अंतर कापणार आहे. ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ ही कोकण मार्गावर धावणारी सर्वांत जलद गाडी असेल.