सद्गुरु श्री अनिरुद्धबापू यांच्यावर दृढ श्रद्धा असलेल्या जुन्नर (पुणे) येथील श्रीमती लक्ष्मीबाई सूर्यकांत गरिबे (वय ७३ वर्षे) !
१. स्वच्छतेची आवड
‘मोठ्या आईला (श्रीमती लक्ष्मीबाई गरिबेकाकूंना) घर स्वच्छ ठेवायला आवडते. त्यांचे इतके वय (वय ७३ वर्षे) होऊनही त्या घर नीटनीटके ठेवतात. त्यांच्या घरी गेल्यावर पुष्कळ प्रसन्न वाटते आणि शांत झोप लागते. मला असा अनुभव बर्याच वेळा आला आहे.
२. देवाविषयीचा भाव
प्रत्येक अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना काकू संपूर्ण घर आणि देवघर यांची पूर्ण स्वच्छता करतात. पूर्वी त्या देवाला अभिषेकही करत असत; पण आता वयोमानामुळे त्यांना ते शक्य होत नाही.
३. गुरुप्राप्तीनंतर अंतर्मुखता वाढणे
काकूंनी त्यांच्या आयुष्यात पुष्कळ चढ-उतार पाहिले आहेत. त्यांचा स्वभाव पहिल्यापासून कडक होता; पण गुरुप्राप्तीनंतर त्या अंतर्मुख झाल्या आणि साधनेकडे अधिक लक्ष देऊ लागल्या. काकांचे देहावसान झाल्यापासून त्या अधिकच साधनारत झाल्या. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्या प्रत्येक गोष्ट त्यांच्या गुरूंना सांगतात आणि त्यांच्या आज्ञेनेच सर्वकाही करतात.
४. सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंवरील श्रद्धा !
त्या म्हणतात, ‘‘भक्ती हवी. भक्तीच्या शक्तीने सर्वकाही होऊ शकते.’’ त्या म्हणतात, ‘‘बापू मला घ्यायला येणार आहेत. (बापू, म्हणजे त्यांचे गुरु सद्गुरु श्री अनिरुद्धबापू.) ते मला म्हणाले आहेत, ‘‘वेळ झाल्यावर यम नाही, मी घ्यायला येईन.’’
– सौ. आर्या अमेय लोटलीकर (श्रीमती लक्ष्मीबाई गरिबे यांची पुतणी, वय ३८ वर्षे), फोंडा, गोवा. (१८.९.२०२२)
साधिकेच्या माहेरचे सर्व जण वेगवेगवेळ्या संप्रदायाच्या माध्यमातून साधना करत असणे आणि ते लक्षात आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गमतीने ‘कुणी भांडत नाहीत ना ?’, असे विचारणे
‘प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) सत्संगात ‘माझ्या माहेरची सर्व मंडळी वेगवेगळ्या संप्रदायाच्या माध्यमातून साधना करत आहेत’, हे समजल्यावर ते गमतीने म्हणाले, ‘‘माझा संप्रदाय मोठा किंवा अधिक चांगला’, असे म्हणून भांडत नाहीत ना कुणी ?’’ त्या वेळी ते हसले. तेव्हा मला जाणवले, ‘अरे हो, इतक्या वर्षांत आपल्या हे लक्षात कसे आले नाही ? आमच्या माहेरी प्रत्येक जण वेगवेगळ्या संप्रदायानुसार साधना करतो; पण कुणी कधीच कुणाला आडकाठी केली नाही. ‘तुला तुझे गुरु सांगतात, तसे कर’, असा सर्वांचा विचार असतो. ‘शेवटी सर्व मार्ग एकच ध्येयप्राप्ती करून देणार आहेत’, हे लक्षात आल्यावर मला ईश्वराप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
– सौ. आर्या अमेय लोटलीकर
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |