४२४ लघुउद्योजकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कर भरण्यासाठी नोटिसा ! – सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका
नवी मुंबई, ३० मे (वार्ता.) – नवी मुंबई महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यास नकार देणार्या ४२४ लघुउद्योजकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कर भरण्यासाठी नोटिसा बजावण्यास प्रारंभ केला आहे, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी दिली. यांतील अनेक उद्योजकांनी अगदी महापालिकेच्या स्थापनेपासून मालमत्ता कर भरलेला नाही. या थकबाकीदारांकडून अनुमाने १५० कोटी रुपयांहून अधिक रक्कम महापालिकेला प्राप्त होणार आहे. बेलापूर पट्टीतील लघुउद्योजकांनी आपण औद्योगिक क्षेत्रात असल्याने महापालिकेने लागू केलेला मालमत्ता कर भरणार नसल्याचे सांगत आंदोलन केले. नंतर महापालिका औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा देत नसल्याचा दावा करत मालमत्ता कर भरण्यास नकार देत न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेले. शेवटी न्यायालयाने ‘सर्व थकबाकीदार लघुउद्योजकांनी मालमत्ता कर भरला नाही, तर पुढील सुनावणी घेणार नाही’, असे स्पष्ट केले. तसेच कर वसुलीसाठी त्यांच्या मालमत्ता सील करण्याचेही आदेश दिले आहेत.