ए.पी.एम्.सी. परिसरातील बस थांबे अडवणार्या ५० हून अधिक बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई !
नवी मुंबई – ए.पी.एम्.सी. परिसरातील फळ मार्केटसह आय.सी.एल्. शाळा आणि अन्य गर्दीच्या बस थांब्यांवर वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्या बेशिस्त वाहनचालकांवर एपीएम्सी वाहतूक पोलीस शाखेद्वारे कारवाई करण्यात आली. या विशेष मोहिमेत ५० हून अधिक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
‘शहरात बस थांब्यांच्या दोन्ही बाजूस १५ मीटरपर्यंतच्या अंतरावर बस व्यतिरिक्त कोणतीही वाहने उभी करू नयेत’, असा नियम आहे. या संदर्भात अनेक बस थांब्यांजवळ ‘नो पार्किंग’चे फलकही महापालिका आणि वाहतूक पोलीस यांच्या माध्यमातून लावण्यात आले आहेत. तरीही बेशिस्त वाहनचालक बस थांब्याच्या जवळ गाड्या उभ्या करून प्रवाशांना बसमध्ये चढण्यासाठी अडथळा निर्माण करत असतात. रिक्शाचालकही तशीच कृती करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. पोलीस उपायुक्त तिरूपती काकडे यांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.