हिंदुसाम्राज्यदिनाच्या निमित्ताने सोलापूर येथे व्याख्यानमाला आणि पालखी सोहळ्याचे आयोजन !
सोलापूर, ३० मे (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त (हिंदुसाम्राज्यदिन) सकल हिंदु समाजाच्या वतीने २ जून या दिवशी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. २ जून या दिवशी दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पालखी मिरवणुकीस प्रारंभ होणार असून शिवस्मारकाच्या मैदानात विसर्जन होणार आहे, अशी माहिती सकल हिंदु समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सर्वश्री ओंकार चराटे, जयदेव सुरवसे, महेश धाराशिवकर, संजय साळुंखे, दत्तात्रय पिसे, नागेश बंडी, अंबादास गोरंटला, रवि गोणे आदी सकल हिंदु समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या पालखी मिरवणुकीच्या अग्रभागी भगवा ध्वज असणार आहे, तर मिरवणुकीमध्ये शस्त्र पथक, लेझीम पथक, ढोल पथक, विविध चित्ररथ, छत्रपती शिवरायांची पालखी, शिवकालीन मर्दानी खेळांचे सादरीकरण होणार आहे.
श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘शिवस्मारका’च्या वतीने व्याख्यानमाला !
श्री शिवाजी महाराज स्मारक मंडळाच्या वतीने ३ ते ५ जून या कालावधीत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवस्मारकाचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी शिवस्मारकाचे कोषाध्यक्ष धनंजय कुलकर्णी, संचालक प्राध्यापक देवानंद चिलवंत, व्यवस्थापक मल्लिनाथ होटकर आदी उपस्थित होते.
१. २ जून या दिवशी सकाळी ८.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिर होईल. ३ जून या दिवशी डॉ. केदार फाळके हे ‘शिवचरित्र सरंमजामशाहीकडून स्वातंत्र्याकडे विस्तारीत जाणारी क्षितीजे’ या विषयावर बोलतील, तर ४ जून या दिवशी ‘भारतीय अस्मितेचा आविष्कार’ या विषयावर बोलतील. ५ जून या दिवशी ‘नक्षलवाद आणि शिवाजी महाराज’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादामध्ये अधिवक्ता प्रदीप गावडे, लेखक कॅप्टन सौरभ वीरकर आणि व्याख्याते तुषार दामगुडे हे सहभागी होणार आहेत.
२. श्री शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त सोलापुरात हिंदु साम्राज्यदिन महोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून शिवस्मारकाच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, छत्रपती शिवरायांवरील चित्रपट महोत्सव, व्याख्याने आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, असेही श्री. बंकापूर यांनी सांगितले. या व्याख्यानमालेस सोलापूरकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु साम्राज्यदिन महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.