जेजुरीतील श्री क्षेत्र खंडोबा मंदिरातील ‘मार्तंड देवस्थान समिती’वर गावकर्यांची नियुक्ती करावी !
ग्रामस्थांची मागणी; आंदोलनास प्रारंभ
जेजुरी (पुणे) – महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्या जेजुरी खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन, जत्रा-यात्रा उत्सवांचे नियोजन करणार्या ‘मार्तंड देवस्थान समिती’वर विश्वस्त म्हणून गावाबाहेरच्या सदस्यांची नियुक्ती केली आहे. स्थानिकांना सोडून बाहेरगावच्या प्रतिनिधींची नेमणूक केल्याने गावकर्यांनी निषेध म्हणून आंदोलनास प्रारंभ केला आहे. देवाची यात्रा, उत्सव गावकर्यांनी करायचे आणि विश्वस्त बाहेरचे नेमायचे हा कुठला न्याय ? आम्हा गावकर्यांना हे मान्य नाही. त्यासाठी आंदोलन चालू केले असून ते आता थांबणार नाही. गावातीलच विश्वस्त झाले पाहिजेत, ही आमची मागणी आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
‘मार्तंड देवस्थान समिती’वर मंगेश घोणे हे एकटेच जेजुरी गावचे, पोपट खोमणे आणि विश्वास पानसे हे पुरंदर तालुक्यातील, तर बाकी ४ जण पुणे जिल्ह्यातील आहेत. मागील विश्वस्तांची मुदत डिसेंबर २०२२ मध्ये संपली. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून जाहीर निविदा प्रसिद्ध करून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले. ५०० जणांचे अर्ज आहेत. त्यातील ८५ अवैध ठरवण्यात आले आहेत, तर ३५० पेक्षा अधिक व्यक्तींच्या मुलाखती घेण्यात आल्या. या विश्वस्त मंडळावर गावातील किमान ४ जणांची नियुक्ती करावी, सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते यांनी निवेदनाद्वारे मागणी केली होती; मात्र विश्वस्त निवडतांना जेजुरी ग्रामस्थांना डावलून जिल्ह्यातील ५ व्यक्तींची निवड करण्यात आली असून ते एकाच राजकीय पक्षाचे असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. मंदिरावर स्वत:च्या पक्षाची सत्ता रहावी म्हणून पक्षश्रेष्ठींनी निवड प्रक्रियेत हस्तक्षेप केला आहे, असा आरोप करत जेजुरी ग्रामस्थांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे.