गोवा : पर्वरी येथील सचिवालयाच्या बाजूला उभारलेल्या मंत्र्यांच्या कार्यालयाचे मंत्रालय असे नामकरण करून आज उद्घाटन
पणजी, २९ मे (वार्ता.) – पर्वरी येथे सचिवालयाच्या बाजूला उभारलेल्या मंत्र्यांचे कार्यालय असलेल्या इमारतीचे (मिनिस्टर ब्लॉकचे) ३० मेपासून मंत्रालय असे नामकरण करण्यात येणार आहे. या मिनिस्टर ब्लॉकच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून ३० मे या दिवशी गोवा घटक राज्यदिनाच्या निमित्ताने या मंत्रालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
#GoaDiary_Goa_News On Statehood Day, Goa copies Maharashtra’s nomenclature for its Secretariat, to call it ‘Mantralaya’ https://t.co/QAwvqTeJkW
— Goa News (@omgoa_dot_com) May 29, 2023
गेल्या काही मासांपासून विधानसभेचे आणि मंत्र्यांचे कार्यालय असलेल्या इमारतीचे नूतनीकरण चालू होते. हे काम पूर्ण झाल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. नवी देहली येथे नूतन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गोव्यात परतल्यावर २९ मे २०२३ या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या वेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, कृषीमंत्री रवि नाईक, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि इतर नेते उपस्थित होते. या वेळी मंत्री भागवत कराड यांनी केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या विविध विकासकामांविषयी माहिती दिली. उद्घाटन सोहळ्याची पूर्ण सिद्धता झाली असून मंत्र्यांच्या कार्यालयांना पाट्याही लागल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय हे वरच्या मजल्यावर असेल. मंत्री, अधिकारी आणि कर्मचारी वगळता इतरांच्या प्रवेशावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर राज्यांत मंत्र्याची कार्यालये असलेल्या इमारतीला मंत्रालय असे संबोधले जाते. त्याच पद्धतीने आता गोव्यातही मंत्र्याची कार्यालये असलेल्या इमारतीला मंत्रालय असे संबोधले जाईल.