भरकटलेल्या हिंदुत्वनिष्ठांची कथा आणि व्यथा
सध्या ‘फेसबुक’ आणि अन्य सामाजिक माध्यमे यांद्वारे ‘मंदिरातून वा घरातून हिंदूंना धर्मशिक्षण दिलेच पाहिजे’, असे संदेश प्रसारित होत असतात. यात चूक नाही. हे आवश्यक आहे; पण नेमकी हिंदुत्वनिष्ठ मंडळींची गडबड कुठे होते आणि आपले नेमके काय चुकते ? याचा थोडा विचार होणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे हा विचार आपणच करायचा आहे. त्यात नास्तिक, पुरोगामी, निधर्मी वगैरेंनी नाक खुपसू नये.
१. आई-वडील, गुरुजन, आदी धर्माचरणाविषयी सांगतात ते धर्मशिक्षणच !
अ. जेव्हा आई एखाद्या मुलाला किंवा मुलीला सांगते की, ‘घरातील केर काढ, दारात सडा टाक किंवा उंबरठा सारवून पुसून दारात रांगोळी काढ’, ते ‘धर्मशिक्षण’च असते.
आ. स्नान झाल्यावर ‘कपाळावर टिळा लाव, देवपूजा कर, स्तोत्र म्हण; दासबोध, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, दत्त माहात्म्य वगैरे प्रासादिक ग्रंथांतील एखाद्या ग्रंथाचे पारायण किंवा नित्य १० ओव्या वाचन कर’, असे घरातील सांगतात, तेव्हा ते ‘धर्मशिक्षण’ असते.
इ. ‘बाबा पूजा करणार आहेत. तू फुले, तुळशी, दूर्वा काढून पूजेची सिद्धता करतांना साहाय्य कर’, हे ‘धर्मशिक्षण’ असते.
ई. जेवतांना आसनावर बसून ‘वदनी कवळ घेता’ वगैरे श्लोक म्हणून कुणाचेही उष्टे खरकटे न खाता आणि ‘पानात अन्न टाकू नकोस’, असे घरचे सांगतात, ते ‘धर्मशिक्षण’च असते.
उ. ‘गुरुजन, वडीलधारी मंडळींच्या समोर उच्च आसनावर बसू नको’, असे घरचे सांगतात, ते ‘धर्मशिक्षण’च असते.
ऊ. पूजेला बसतांना ‘धोतर, सोवळे, उपरणे, साडी नेसून बसा’, असे घरचे सांगतात, ते ‘धर्मशिक्षण’च असते.
ए. ‘अंंघोळ करून, केस बांधून स्वयंपाक करा’, असे घरचे सांगतात, ते ‘धर्मशिक्षण’ असते.
ऐ. ‘देवाला नैवेद्य, गोग्रास, काकबली समर्पण करा; अतिथी भिक्षेकरी आल्यास त्याला ४ घास अन्न द्या’, असे घरचे सांगतात, ते ‘धर्मशिक्षण’ असते.
खोटे बोलू नका, व्यसन करू नका, आपले सणवार आणि कुलाचार सांभाळा, हव्य-कव्य कर्म करा (हव्य म्हणजे देवतांना उद्देशून यज्ञयाग वगैरे आणि कव्य म्हणजे पितरांना उद्देशून श्राद्ध, पक्ष वगैरे), तुळशीला पाणी घाला, सायंकाळी दिवा लावा, ‘शुभं करोती’ म्हणा, मंदिरात जातांना आणि घरात आल्यावर चपला बाजूला काढा अन् हात-पाय धुवून आत चला, अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपल्याला आपले घरचे सांगतात. ‘आपले पुरोहित, गुरुजन सतत सांगत असतात’, हेच स्वल्प प्रमाणातील धर्माचरण आहे.
‘हिंदु धर्म लवचिक आहे’, असले नवीन फॅड घुसवले आहे. ‘पँट घालून पूजेला बसलो, तर काय बिघडले ?’, असे प्रश्न आपणच विचारतो आणि कामावर जातांना मात्र कार्यालयातील ‘ड्रेसकोड’ (वस्त्रसंहिता) पाळतो.
२. भावनेसह कर्म आणि त्यासाठीची सामुग्री शुद्ध असणे महत्त्वाचे !
धर्म हा आचरणात आणण्याची आणि धारण करण्याची गोष्ट आहे. ‘मन शुद्ध आहे, म्हणजे काही करून चालते’, ही शुद्ध पळवाट आहे. एक विचार करा, ‘तुम्हाला कुणी आपल्या घरी जेवायला शुद्ध मनाने बोलावले, तुम्ही त्याच्या घरी गेला आणि त्या यजमानाला त्या वेळी शौचास/लघुशंकेस जावे लागले अन् त्यांनी शौचालयातून आल्यावर हात-पाय न धुता, शरीरशुद्धी न करता तसेच शुद्ध मनाने तुम्हाला भोजन वाढले, तर तुम्ही जेवाल का ?’, हा प्रश्न स्वतःला विचारा.
शल्यकर्म करणार्या वैद्यांची भावना शुद्ध आहे; पण शल्यकर्म करतांना लागणारी उपकरणे त्यांनी स्वच्छ निर्जंतुक करून घेतली नाही, तर काय होईल ? भावना जेवढी शुद्ध आवश्यक, तेवढेच महत्त्वाचे कर्म आणि त्यासाठी लागणारी सामुग्री शुद्ध असणे आवश्यक आहे.
३. धर्मशिक्षण म्हणजे स्वतःचा सर्वांगीण उत्कर्ष साधणे !
धर्मशिक्षण म्हणजे केवळ मंत्र म्हणणे नाही, तर यासमवेत स्वतःचे आचार-विचार, आपली परंपरा, आपले ज्ञान, संस्कृती यांचा परस्पर समन्वय साधणे आणि स्वतःचा सर्वांगीण उत्कर्ष साधणे आहे. वरील गोष्टी जेव्हा आपल्याला आपले घरचे सांगतात, तेव्हा आपण दुर्लक्ष अथवा वाद करतो आणि ‘समाजमाध्यमांवर धर्मशिक्षण आवश्यक आहे’, असे म्हणतो.
या सर्व गोष्टी पहिल्या टप्प्यातील आहेत. या आधी आचरणात आणल्या, तर पुढे अधिक प्रगती होणार आहे.
– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग. (२४.५.२०२३)