रत्नागिरी येथील श्री. पुरुषोत्तम वागळे यांना आलेल्या अनुभूती
१. तळमळीने केलेली प्रार्थना गुरुदेवांपर्यंत पोचून रामनाथी आश्रमात जाण्याची इच्छा पूर्ण होणे
‘मी कधी रामनाथी आश्रमात गेलो नसल्याने गुरुदेवांना पाहिले नव्हते. ‘त्यांच्या दर्शनाला जावे’, असा विचार माझ्या मनात नेहमी येत असे; परंतु मला रामनाथीला जाता येत नव्हते. मी प्रतिदिन गुरुदेवांच्या छायाचित्रासमोर बसून त्यांना प्रार्थना करत असे. एक दिवस मात्र मला गुरुदेवांची आठवण येऊन रहावेना आणि माझ्या मुखातून ‘परम पूज्य’ असा नामजप बाहेर पडून डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ‘परम पूज्य, मी माझ्यात पालट करण्यास असमर्थ आहे. माझ्याकडून काहीच प्रयत्न होत नाहीत. गुरुदेवा, मी न्यून पडत आहे, तरीही मी तुमच्या चरणांपाशी येण्याची आणि तुम्हाला डोळे भरून पहाण्याची अपेक्षा करीत आहे; परंतु कोरोनामुळे मी आपल्या चरणांपाशी येऊही शकत नाही. गुरुदेवा, मी काय करू ? काय करू ?’ अशी माझ्याकडून कळवळून प्रार्थना झाली. माझ्या मनात सारखे तेच विचार होते.
काय चमत्कार ! दुसर्या दिवशी रामनाथी आश्रमात रहात असलेली माझी भाची कु. प्रियांका लोटलीकर (आताच्या सौ. प्रियांका गाडगीळ, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) हिचा मला दूरभाष आला. ती म्हणाली, ‘‘मामा, तुझ्यासाठी सेवा आहे. तुला रामनाथी आश्रमात यायचे आहे. तू लगेच ये.’’ त्या वेळी माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. देवाने माझी हाक ऐकली. परम पूज्य मला तिच्या माध्यमातून बोलावत असल्याची मनातून जाणीव होऊन माझा भावही जागृत झाला. देवाने माझी इच्छा पूर्ण केली. त्यानंतर मी रामनाथीला आलो. तेव्हा ‘आपण देवाला आतून मारलेली हाक देवापर्यंत पोचते’, हे माझ्या लक्षात आले.
२. भावसत्संगात आलेली अनुभूती
२ अ. पू. (कै.) लोटलीकर आजींच्या मृत्यूनंतरच्या विधींच्या ठिकाणी गेल्यावर तेथे अन्य लोकांचे विधी होत असतांना डोके जड होऊन दाब जाणवणे आणि त्या दिवशी ‘भावसत्संगाला जाऊ नये’, असे वाटणे : १९.२.२०२१ या दिवशी माझ्या बहिणीच्या सासूबाई (कै.) पू. लोटलीकर आजींचा (सनातनच्या ९९ व्या संत (कै.) पू. विजया लोटलीकर यांचा) गोव्यातील हरवळे गावी रुद्र देवतेच्या तीर्थस्थानी दशपिंड विधी (१० वा दिवस) होता. मीसुद्धा त्या ठिकाणी गेलो होतो. आम्ही गेलो त्या वेळी अन्य लोकांचे विधी चालू होते. २ घंट्यांनी विधी आटोपून आम्ही परत यायला निघालो. त्या वेळी माझे डोके जड झाले होते. संपूर्ण शरिरावर दाब जाणवत होता. मला जडत्व आले होते. मी दुपारी आश्रमात येऊन महाप्रसाद घेतला. माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. त्या दिवशी आमचा भावसत्संग होता. भावसत्संगाला जाण्याची वेळ झाली होती; परंतु एक मन भावसत्संगाला जाण्यास सिद्ध नव्हते. ‘भावसत्संगाला जाऊ नये’, असे मला तीव्रतेने वाटत होते. त्याच वेळी दुसर्या मनाने या विचाराला तीव्र विरोध केल्यामुळे मी भावसत्संगाला गेलो.
२ आ. भावसत्संगात सांगितल्याप्रमाणे सूर्यदेवाचे स्मरण करून भावार्चना ऐकल्यावर देहाभोवती सूर्याचे पिवळ्या रंगातील चैतन्य आल्याचे जाणवणे आणि देहावरील दाब न्यून होऊन देह हलका झाल्याचे जाणवणे : आमचा भावसत्संग वेळेत चालू झाला. त्या दिवशी रथसप्तमी असल्याने भावसत्संगात एका ताईने ‘डोळे मिटून सूर्यदेवाचे स्मरण करा’, असे सांगून ‘सूर्यदेवाचे चैतन्य’ या विषयावर भावार्चना सांगायला प्रारंभ केला. त्याच वेळी माझ्या देहाभोवती सूर्यदेवाचे पिवळ्या रंगाचे चैतन्य आल्याचे मला दिसले. त्या चैतन्यामुळे माझ्या देहावरील दाब हळूहळू न्यून झाला. हृदयाचे ठोकेही सामान्य होऊन मला शांतता जाणवली आणि माझा संपूर्ण देह एकदम हलका झाल्याचे मला जाणवले. मी भावार्चना संपेपर्यंत त्याच स्थितीत होतो. मला पुष्कळ चांगले वाटले.’
– श्री. पुरुषोत्तम वागळे, रत्नागिरी (२५.२.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |