परात्पर गुरु डॉक्टरांकडून शिवणकलेत परिपूर्णता आणण्याच्या संदर्भात ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. पार्वती जनार्दन यांना शिकायला मिळालेली सूत्रे !
‘बंडी आणि सदरा घातल्यानंतर त्यावर कुठेही चुण्या यायला नकोत’, असे गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) सांगायचे; पण ६.७.२०१९ या दिवशी परम पूज्य (परात्पर गुरु डॉ. आठवले) म्हणाले, ‘‘कपड्यामध्ये चुण्या येणे सर्वसामान्य आहे; पण त्या चुण्या वेड्यावाकड्या नकोत. त्यातल्या त्यात सरळ रेषेमध्ये १ – २ चुण्या आल्या, तरी चालतील. आतापर्यंत ‘चुण्या यायला नको’, असा प्रयोग करत आलो. यात वेळ वाया घालवला. असू दे. देवाला यातून आपल्याला काहीतरी शिकवायचे होते.’’ गुरुदेवांचे हे बोल सत्यच आहेत; कारण मला काही बारकावे या प्रयोगाच्या माध्यमातून शिकता आले, उदा. बाहेर शिवणकाम करत असतांना गिर्हाईकाने आपल्याला मापाला दिलेल्या कपड्याप्रमाणे मी शिवून देत होते. त्याचा कुठलाही प्रकारचा अभ्यास करत नव्हते. शिवणकामाची सेवा करायला आरंभ केल्यानंतर मला काही सूत्रांचा अभ्यास करायला मिळाला.
१. स्थुलातून शिकायला मिळालेली सूत्रे
१ अ. व्यक्तीच्या कपड्यात सध्याच्या मापाने सुधारणा करणे : आपल्याकडे कुणी कपडे सुधारणा करण्यासाठी आणले, तर ‘त्याच्या सध्याच्या मापाप्रमाणे ते कपडे होतील कि नाही ?’, याची निश्चिती करून नंतरच ‘त्या कपड्यांमध्ये सुधारणा करायची कि नाही ?’, याचा विचार करावा.
१ आ. कापड खरेदी करतांना करायचा अभ्यास : चुण्या न पडणारे (‘रिंकल फ्री’), न उकडणारे कापड, चित्रीकरणाच्या दृष्टीने सात्त्विक रंगाची निवड आणि किंमत यांचा अभ्यास करावा.
१ इ. मुंढा बेतणे : काखेतील एका बिंदूकडे (मुंढ्याकडे) कापडाच्या चार बाजू जोडल्या जात असल्यामुळे तिकडे चुण्या अधिक येतात; म्हणून मुंढा बेततांना (आकार कापतांना) तिकडे चुण्या येणार नाहीत, यासाठी ‘आकार किती मोठा हवा ?’, ते पाहून कापड कापावे.
१ ई. शिलाई करतांना
१. अल्प शिलाईत सुंदर कपडे शिवणे
२. कपड्यावर सुरकुत्या अल्प प्रमाणात येण्यासाठी प्रयत्न करणे
३. चित्रीकरणाच्या दृष्टीने सदर्याच्या उंचीच्या संदर्भात अभ्यास करणे
४. कुठल्या कपड्याला कुठली सुई वापरली, तर ‘चुण्या अल्प पडतील ?’, याचा अभ्यास करणे
५. ‘कुठल्या कपड्यासाठी कुठले शिवणयंत्र वापरायचे ?’, त्याचा अभ्यास करणे
६. सदर्याच्या गळ्याला गोट (गोलाकार, पायपिंग) करायचा असेल, तर त्याचा आकार पूर्ण गोल येईल, असा शिवणे
७. सदर्याच्या बाजूला असणार्या खिशांत हात घालतांना सोपे जाईल, अशा पद्धतीने खिसा शिवणे
८. सदरा शिवून झाल्यानंतर त्याला बटण लावतांना दोन बटणांमधील अंतर एकसारखे ठेवायचे आणि बटणाचा रंग कपड्याच्या रंगाशी जुळणारा असावा. बटणावर नक्षी नसावी, तसेच बटण चमकणारे नसावे; कारण चित्रीकरण करतांना त्याचे प्रतिबिंब (‘रिल्फेक्शन’) येते.
९. सदर्याला इस्त्री केल्यानंतर घडी करतांना गळ्यापासून दोन्ही बाजूंनी एकसारखे दुमडून घडी करावी. ‘कपडे ठेवण्यासाठी आपल्या कपाटात किती जागा आहे ?’ त्यानुसार तो न्यूनतम दुमडावा. त्यामुळे कपड्याला केलेली इस्त्री नीट राहील. कपडे ‘हँगर’ला अडकवणार असू, तर ‘हँगर’चे तोंड (वरच्या वळलेल्या भागाचे टोक) भिंतीच्या बाजूला असावे.
२. आध्यात्मिकदृष्ट्या शिकायला मिळालेली सूत्रे
‘शिवणकलेला अध्यात्माची जोड देणे’, हेही मला शिकायला मिळाले. ‘प्रार्थना, नामजप, भाव आणि कृतज्ञता’ या सर्वांची सांगड घालून सेवा कशी करायची ?’, ते शिकायला मिळाले.
२ अ. बंडीशी बोलून तिला प्रार्थना करणे : एकदा एका बंडीची सुधारणा करतांना त्या बंडीच्या कापडाला उद्देशून मी म्हटले, ‘तुला किती वेळा सुईने टोचले जाते. इस्त्रीने गरम केले जाते, तरी तू (बंडी) कशी काय एवढे शांत राहू शकतेस ? तसे ‘मलाही शांत राहून सेवा करता येऊ दे’, अशी प्रार्थना आपोआप केली गेली. त्यानंतर त्या कापडाची शिवलेली बंडी परम पूज्यांना दाखवल्यावर ती बरोबर झाली होती.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘कपड्यापेक्षा साधकाच्या मनाचा कपडा सुरकुत्या विरहित, म्हणजेच दोषरहित करायचा आहे’, असे लक्षात येणे
प.पू. डॉक्टरांना आम्ही साधक घडणे अपेक्षित असायचे. त्यामुळे कपडे शिवतांना आमच्या मनाची जी स्थिती असायची, त्यावरून ते सुधारणा सांगायचे, उदा. कधी परम पूज्यांनी ‘एखादी चुणी असतांना सुधारणा कर’, असे सांगितल्यावर मला वाटायचे, ‘आता उसवायला नको. इथेच थांबूया. यापुढे अजून मला काही जमणार नाही.’ मी परम पूज्यांना असे सांगितले की, ते म्हणायचे, ‘‘थोडेसे करून बघूया.’’ ‘थोडेसे करूया’, असे म्हणत ते आमच्यामध्ये उत्साह वाढवायचे. कधी म्हणायचे, ‘कपडे म्हटल्यावर त्यात चुण्या येणारच.’
३ अ. सकारात्मकतेने शिवण झाल्यावर त्यात सुधारणा न सांगणे : मन सकारात्मक ठेवून देवाला आर्ततेने शरण जाऊन बंडी शिवली, तर तिच्यात सुधारणा नसायच्या. यावरून माझ्या लक्षात आले, ‘देवाला कपडे महत्त्वाचे नाहीत, तर आमच्या मनाची साधना कशी होते ?’, ते देव बघत आहे. या सेवेतून मला माझे ‘नकारात्मक विचार करणे, अभ्यासू वृत्ती नसणे, संयम नसणे, ‘लवकर पूर्ण व्हायला पाहिजे’, अशी स्वतःकडून अपेक्षा असणे’, असे स्वभावदोष लक्षात यायचे. ही सेवा करतांना गुरुदेवांनी माझ्यामध्ये ‘संयम ठेवणे, ईश्वरेच्छा म्हणून स्वीकारणे आणि सकारात्मक विचार करणे’ या गुणांची वाढ केली.
परात्पर गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) बारकाव्यांसहित जे शिकवले आणि विविध प्रकारेे कपडे शिवून घेतले, तसे मला बाहेर शिकायला मिळाले नसते.’
– सौ. पार्वती जनार्दन (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ३३ वर्षे) (२१.५.२०२१)