दैनिक ‘सनातन प्रभात’ने निदर्शनास आणून दिलेली बसस्थानकांची दुरवस्था रोखणार !
|
मुंबई, २९ मे (वार्ता.) – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्य सरकारने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ-सुंदर बसस्थानक अभियान’ घोषित केले; मात्र प्रत्यक्षात हे अभियान राबवण्यासाठी एस्.टी. महामंडळाकडे पैसे नाहीत. त्यामुळे एस्.टी. महामंडळाच्या राज्यातील एकूण ५८० बसस्थानकांची स्वच्छता आणि सुशोभिकरण यांसाठी प्रायोजक मिळवण्याची सूचना एस्.टी. महामंडळाकडून सर्व विभागीय नियंत्रकांना देण्यात आली आहे. प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बसण्यासाठी आसनव्यवस्था, कचराकुंड्या, रंगरंगोटी आदी विविध कामे यांतून केली जाणार आहेत. दैनिक ‘सनातन प्रभात’मधून एस्.टी.च्या बसस्थानकांच्या दुरवस्थेविषयी आवाज उठवण्यात आला होता. त्यानंतर ही कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दैनिक ‘सनातन प्रभात’ने उघड केलेल्या दुरवस्थेमध्ये होणार सुधारणा !
दैनिक ‘सनातन प्रभात’ने राज्यातील १७ बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रांसह माहिती प्रसिद्ध केली होती. यामध्ये बसस्थानकांवरील तुटलेले पिण्याच्या पाण्याचे नळ, अपुरी आसनव्यवस्था, तुटलेली बाकडी, अस्वच्छ प्रसाधनगृहे, पान-तंबाखूच्या पिचकार्यांनी रंगलेल्या भिंती अशा प्रकारांचा समावेश होता. ही सर्व कामे आता स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत केली जाणार आहेत.