अनंतात जाण्‍याच्‍या प्रवासाची सिद्धता

॥ श्रीकृष्‍णाय नम: ॥

पू. अनंत आठवले

मनुष्‍याला लहान-सहान प्रवासाला जायचे असले, तरी तो आधीपासून बरोबर न्‍यायच्‍या वस्‍तू, कपडेे,पैसे इत्‍यादींची सिद्धता करतो; पण अंती अनंतात जाण्‍याच्‍या प्रवासाची सिद्धता मात्र कधीच करीत नाही.

अंती म्‍हणजे स्‍वत:चा अंत होण्‍याच्‍या वेळी, मृत्‍यूच्‍या वेळी; आणि अनंतात जाणे म्‍हणजे भगवान् विष्‍णूंशी, ईश्‍वराशी एकरूप होणे. महाभारतातील विष्‍णुसहस्रनामस्‍तोत्रात १०८ व्‍या श्‍लोकात विष्‍णूंचे ‘अनंत’ हे नाव आले आहे.

मृत्‍यूनंतर पुनर्जन्‍म नको असेल तर त्‍या अनंताशी, ईश्‍वराशी एकरूप व्‍हायला हवे. त्‍यासाठीच्‍या प्रवासाची सिद्धता म्‍हणजे शुद्धचित्त होऊन श्रद्धा आणि विश्‍वासाने  ईश्‍वराची भावपूर्ण भक्‍ती , ही भक्‍तीमार्गाची साधना करायला हवी.

अनंतात जाण्‍याचा दुसरा एक उपाय आहे. ‘ सत्‍यं ज्ञानं अनन्‍तं ब्रह्म’ असे तैत्तिरीयोपनिषदात (ब्रह्मानन्‍दवल्ली २ अनुवाक १ मन्‍त्र १) सांगितले आहे. म्‍हणजे ब्रह्म खरोखरीच आहे, ज्ञानमय आहे आणि अनंत अर्थात् स्‍थळ, काळ आणि वस्‍तूंची मर्यादा नसलेले अंतहीन आहे. अशा अनंत ब्रह्मात विलीन व्‍हायचे असेल तर त्‍याच्‍या स्‍वरूपाला जाणणे आणि त्‍या स्‍वरूपात विलीन होण्‍याच्‍या उपायांना जाणून त्‍यानुसार आचरण, ही त्‍या प्रवासाची सिद्धता म्‍हणजे ज्ञानमार्गाची साधना करायला हवी.

अशी सिद्धता केली नाही, तरी प्रवास तर होणारच आहेत. पुन्‍हा पुन्‍हा जन्‍मणे आणि पुन्‍हा पुन्‍हा मरणे, असे जीवात्‍म्‍यांचे, संख्‍येला अंत नसलेले, अनंत प्रवास होतच राहतील. पुन्‍हा पुन्‍हा जन्‍म का नको? कारण आपण जीवनात पदोपदी दु:ख अनुभवत असतो. भगवान् श्रीकृष्‍णांनीही भगवद़्‍गीतेत पुनर्जन्‍माला ‘दु:खालयमशाश्‍वतम्’(अ.८ श्‍लोक १५) म्‍हणजे ‘दु:खाचे स्‍थान आणि अनित्‍य’ म्‍हटले आहे. महाराष्‍ट्राच्‍या एका संत कवयित्रीने म्‍हटले आहे ‘सुख आहे जवापाडे । दु:ख पर्वताएवढे॥’. ह्या दु:खांच्‍या पुनरावृत्त्या टाळण्‍यासाठी कोणत्‍यातरी साधनेने अंतिम प्रवासाची सिद्धता केली, तर अनंतात विलीन होऊन जन्‍म-मरणाच्‍या प्रवासांचा अंत होईल.

– अनंत आठवले.

१३.४.२०२३

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ 

पू. अनंत आठवले यांच्‍या लिखाणातील चैतन्‍य न्‍यून न होण्‍यासाठी घेतलेली काळजी

लेखक पूजनीय अनंत आठवले (पूजनीय भाऊकाका) हे संत असल्‍याने त्‍यांच्‍या लिखाणात चैतन्‍य आहे. ते चैतन्‍य न्‍यून होऊ नये; म्‍हणून त्‍यांच्‍या लिखाणाची पद्धत, भाषा आणि व्‍याकरण यांत पालट केलेले नाहीत.